यामुळे स्वाभाविकपणेच कर्मामध्येही मुक्तता कशी मिळवावयाची या विषयाकडे आपण येतो. कारण कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो.
ज्यामुळे शरीरात समतोलपणा, सामर्थ्य आणि सौंदर्य यांची वाढ होण्यास मदत होईल, अशाच रीतीने सर्व शारीरिक क्रियांची आखणी केली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवल्यानंतर, कामवासनेच्या उपभोगासकट सर्व प्रकारच्या सुखतृष्णेपासून व्यक्तीने दूर राहिले पाहिजे. कारण कामोपभोगाची प्रत्येक क्रिया म्हणजे मृत्यूकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि म्हणूनच फार फार प्राचीन काळापासून सर्व पवित्र आणि गुप्त संप्रदायांत, अमरत्वाच्या प्राप्तीसाठी झटणाऱ्या प्रत्येक साधकाला कामवासना-तृप्तीस पूर्ण बंदी असे. कारण अशा कामतृप्तीच्या मागोमाग कमी-अधिक अचेतनेचा काळ येतो, या स्थितीत सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रभावांना द्वार खुले होते आणि मनुष्याची जाणीव खाली उतरते.
तेव्हा एखाद्या व्यक्तीला जर अतिमानसिक जीवन जगण्याच्या इच्छेने स्वत:ची तयारी करावयाची असेल, तर त्याने सुखोपभोगासाठी, एवढेच नव्हे, तर आराम म्हणून किंवा ताण कमी करण्याच्या निमित्ताने सुद्धा आपली जाणीव ढिसाळपणा व निश्चेतनतेपर्यंत कधीच खाली घसरू देता कमा नये. व्यक्तीने शक्ती आणि प्रकाश यामध्येच विश्रांती मिळविली पाहिजे, अंधकार किंवा दुर्बलता यांत नव्हे.
म्हणूनच प्रगतीची आस बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात ब्रह्मचर्यत्वाचे व्रत असले पाहिजे; पण विशेषत: ज्यांना स्वत:ला अतिमानसिक शक्तीच्या आविष्कारासाठी तयार करावयाचे असेल, त्यांच्या बाबतीत ब्रह्मचर्याची जागा संपूर्ण परिवर्जनाने (abstinence) घेतली पाहिजे. हे परिवर्जन बळजबरीने व दमनाने नव्हे तर, एक प्रकारच्या आंतरिक किमयेमुळे साध्य झाले पाहिजे. सर्वसाधारणपणे प्रजननार्थ केलेल्या कृतीमध्ये ज्या शक्ती उपयोगात येतात त्या शक्तींचे, विकास आणि संपूर्ण रूपांतरणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शक्तींमध्ये रूपांतर झाल्याचा परिणाम म्हणून ही आंतरिक किमया उदयास येते. हे तर उघडच आहे की, हा परिणाम संपूर्ण व खरोखरीच हितकारी होण्यासाठी मानसिक, प्राणिक जाणिवेतून इतकेच नव्हे तर, शारीरिक इच्छेतूनही सर्व कामप्रवृत्ती व कामेच्छा समूळ नष्ट व्हायला पाहिजेत. सर्व आमूलाग्र व चिरस्थायी रूपांतरण हे आतून बहिर्गामी दिशेने अग्रेसर होते त्यामुळे कोणतेही बाह्य रूपांतरण हे वरील प्रक्रियेचा स्वाभाविक व जवळजवळ अटळ असा परिणाम असते.
मानववंश जसा आहे तसाच चिरस्थायी राखण्याची प्रकृतीची जी मागणी आहे, त्या मागणीपुढे मान तुकवून, तिचे हे साध्य यशस्वी व्हावे म्हणून, हा देह प्रकृतीला देऊ करावयाचा का; एका नूतन वंशाच्या निर्मितीच्या दिशेने टाकावयाचे पाऊल बनण्यासाठी, ह्या देहाची तयारी करावयाची ही निर्णायक निवड करावयास हवी. कारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येणे शक्य नाहीत; व्यक्तीला भूतकालीन मानववंशाचा एक भाग बनून राहावयाचे आहे की, भावीकाळातील अतिमानववंशाशी संबंधित व्हावयाचे आहे, हे व्यक्तीने प्रत्येक क्षणी ठरवावयाचे आहे.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 53-54)
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०२ - September 30, 2024
- कर्म करताना कर्मरूप होणे – ०१ - September 29, 2024
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024