शांत, विश्रांतियुक्त झोप घेण्यासंबंधीची ही रात्रीची तपस्या झाल्यानंतर आता दिवसभर करण्याची तपस्या पाहू.

सबंध दिवसाची आखणी विचारपूर्वकतेने करावी. दिवसभरातील सर्व कार्यक्रमाची विभागणी दोन प्रकारच्या क्रियांमध्ये केली पाहिजे. एक म्हणजे शरीरसंवर्धनासाठी आवश्यक असलेला, विकसनशील व कौशल्यपूर्ण रीतीने आखलेला श्रेणीबद्ध व्यायाम आणि दुसरे म्हणजे तुम्ही करीत असलेले कोणतेही भौतिक कर्म, कारण या दोन्हीही गोष्टी शारीरिक तपस्येची अंगे होऊ शकतात व झाली पाहिजेत.

व्यायामाच्या बाबतीत प्रत्येकाने आपल्या शरीरास जास्तीत जास्त जुळणारा व्यायाम निवडावा. व्यायामापासून जास्तीत जास्त परिणाम साध्य व्हावा या दृष्टीने, व्यायाम-प्रकारांची जुळणी कशी करावी व क्रम कसा लावावा, कोणत्या व्यायामाला कोणत्या व्यायामाची जोड द्यावी हे जाणणाऱ्या तज्ज्ञाचे, शक्यतो मार्गदर्शन घ्यावे.

व्यायामाची निवड करताना किंवा प्रत्यक्ष व्यायाम करताना कोणत्याही प्रकारच्या लहरीपणाचा अंमल असता कामा नये. एखादा व्यायाम केवळ सोपा किंवा अधिक मनोरंजक वाटतो म्हणून तुम्ही तो करता कामा नये. तुमच्या व्यायामात बदल करणे आवश्यक आहे असे तुमच्या प्रशिक्षकास वाटत नसेल तर, तुम्ही तुमच्या व्यायामात बदल करता कामा नये. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराबाबत स्वयंपरिपूर्णता किंवा अगदी साधीशी स्वयंसुधारणा असो, ह्या गोष्टी म्हणजे जणू एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासारखाच प्रकार असतो. आणि त्याकरता धीर, चिकाटी आणि नियमितता यांची अत्यंत आवश्यकता आहे. बहुसंख्य लोकांची समजूत काही का असेना, पण खेळाडूंचे जीवन केवळ मौजेचे व स्वच्छंदीपणाचे जीवन नसते. उलट ते पद्धतशीर प्रयत्न व कठोर सवयी यांनी युक्त असते. त्यामध्ये अपेक्षित परिणामांना घातक असलेल्या निरर्थक आवडीनिवडींना स्थान नसते.

कर्माच्या बाबतीतही एक प्रकारची तपस्या आहे. भौतिक कर्मामध्ये आवडनिवड वा पसंती-नापसंती असता कामा नये; हाती घेतलेले कोणतेही काम असो ते मनापासून, आवडीने केले पाहिजे; ह्यामध्येच कर्मातील तपस्या सामावलेली आहे.

कारण पूर्णत्वप्राप्ती करून घेण्याची ज्याची इच्छा आहे, त्याच्या दृष्टीने कोणतेच कर्म हलके किंवा मोठे नाही; कोणतेच कर्म महत्त्वाचे किंवा दुय्यम असे नसते. आत्म-प्रभुत्व आणि प्रगती यांची आकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तीला सर्वच कर्मे सारखीच उपयुक्त असतात. एखाद्याला ज्या कामात गोडी असेल तेच काम फक्त तो उत्तम रीतीने करतो असे म्हणतात, हे खरे आहे. पण त्याहीपेक्षा सर्व कामांत, अगदी क्षुल्लक भासणाच्या कामांतही, रस घ्यायला शिकता येणे शक्य असते, ही गोष्ट अधिक खरी आहे.

स्वयंपरिपूर्णत्वाबद्दल किती तीव्र तळमळ आहे यावर या बाबतीतील यश अवलंबून आहे. कोणतेही कर्म किंवा कार्य तुमच्या वाट्याला आलेले असो, तुम्ही ते प्रगती करण्याच्या इच्छेने पार पाडले पाहिजे. एखादा जे काही करीत असेल, ते त्याने त्याला जमेल तेवढ्याच सर्वोतमपणे न करता, त्यात पूर्णत्व येण्यासाठी ते अधिकाधिक चांगले कसे करता येईल यासाठी सतत प्रयत्न करीत झटले पाहिजे. अशा रीतीने, अगदी शारीरिक कष्टापासून ते थेट कलात्मक किंवा बौद्धिक कामापर्यंत निरपवादपणे कोणतेही कर्म आनंददायक वाटू लागते. प्रगतीचे क्षेत्र अमर्याद आहे आणि म्हणूनच अगदी छोट्याछोट्या गोष्टींतही आपण त्याचा अवलंब करू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 52-53)

श्रीमाताजी