सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते.
पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, सवयी कितीही चांगल्या असल्या तरी त्यांचे गुलाम होता कामा नये. आपल्या सवयी आवश्यक तेव्हा बदलता याव्यात म्हणून आपण त्यामध्येदेखील प्रत्येक वेळी अतिशय लवचीकपणा राखला पाहिजे.
व्यक्तीने शक्तिसंपन्न व लवचीक अशा स्नायूंमधील आपले मज्जातंतू पोलादाप्रमाणे घडवले पाहिजेत. म्हणजे केव्हाही कितीही ताण सहन करण्याचा प्रसंग आला तरीही व्यक्ती तो सहन करण्यास पूर्ण समर्थ असेल. पण त्याचवेळी अशीही काळजी घेतली पाहिजे की, ज्या शक्तिवेचामुळे विकास आणि प्रगतीला चालना मिळेल केवळ असेच प्रयास, जे अगदी अत्यंत अनिवार्य आहेत असेच प्रयास केले पाहिजेत. यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिक गोष्टींची शरीराकडून आपण मागणी करणार नाही याविषयी आपण जागरूक राहावयास हवे. आणि त्याचवेळी ज्यामुळे शरीराला थकवा येतो आणि परिणामत: शारीरिक क्षीणता व विघटनामध्ये त्याचा अंत होतो अशा सर्व गोष्टी कटाक्षाने टाळावयास हव्यात.
उच्चतर चेतनेचे योग्य साधन बनण्यास शरीराला समर्थ करावयाचे हे शारीरिक संस्कृतीचे ध्येय असल्याने त्याकरता अत्यंत काटेकोरपणे सवयी लावून घेतल्या पाहिजेत : झोप, आहार, शारीरिक व्यायाम व इतर सर्वच हालचाली यामध्ये अतिशय नियमितपणा असला पाहिजे.
आहारविषयक तपस्या
प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा भिन्न असल्याने प्रत्येकाने आपल्या शरीराला खरोखरीच कशाची गरज आहे हे विशेष बारकाईने व सावधानतेने अभ्यासून नंतर स्वत:साठी एक सर्वसाधारण कार्यक्रम आखला पाहिजे. एकदा कार्यक्रम निश्चित केला म्हणजे त्यामध्ये कोणताही लहरीपणा किंवा ढिलेपणा येऊ न देता तो अगदी काटेकोरपणे अनुसरला पाहिजे. ‘फक्त एकदाच’ असे म्हणून देखील नियमाला अपवाद करता कामा नये – कारण बहुधा त्याची पुनरावृत्ती होतेच. ‘केवळ एकदाच’ म्हणून जरी तुम्ही एखाद्या प्रलोभनास बळी पडलात, तरी त्यामुळे तुमच्या संकल्पाची प्रतिकारशक्ती कमी होते व सर्व प्रकारच्या अपयशांना तुम्ही दरवाजे उघडे करून देता.
तुम्ही सर्व प्रकारची दुर्बलता नाहीशी केली पाहिजे; ज्यामुळे तुम्ही संपूर्ण नि:शक्त बनून परत येता असे कोणतेही रात्रीचे उशीरापर्यंतचे कार्यक्रम, अपचनास कारणीभूत ठरणाऱ्या मेजवान्या किंवा अधाशीपणा, ज्यामुळे शक्तीचा केवळ व्यय होतो व दैनंदिन कर्म करण्यासही उत्साह राहत नाही, असे मजेखातर केलेले कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम, किंवा कालापव्यय करणाऱ्या गोष्टी यांना तुम्ही आळा घातला पाहिजे.
ज्यामुळे शरीरावर सर्व लक्ष केंद्रित करून, त्याला शक्य तितके पूर्णत्व आणता येईल असे ज्ञानयुक्त व नियमित जीवन जगण्याची तुम्ही तपस्या केली पाहिजे. या आदर्श ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरेक, लहानमोठी सर्व व्यसने कटाक्षाने वर्ज्य केली पाहिजेत; तंबाखू, मद्य यांसारखी सौम्य विषे घेणेही वर्ज्य केले पाहिजे. ह्या गोष्टींना मनुष्य आपल्या अनिवार्य गरजा करून बसतो आणि त्यामुळे त्याची इच्छाशक्ती व स्मरणशक्ती हळूहळू नष्ट होऊन जाते.
बहुतेक सर्वजण, अगदी बौद्धिक पातळीवर जगणाच्या व्यक्तीसुद्धा, खाद्य पदार्थ, ते बनविण्याच्या पद्धती आणि त्यांचे सेवन यामध्ये रममाण होऊन विशेष रस घेताना दिसतात; त्याऐवजी त्यांनी शरीराच्या गरजांचे रासायनिक दृष्टीने ज्ञान करून घेतले पाहिजे आणि संपूर्ण शास्त्रीय दृष्टी स्वीकारून, तपस्यापूर्वक त्या भागविल्या पाहिजेत.
विश्रांतीपूर्ण निद्रा
या आहारविषयक तपस्येला आपण दुसऱ्या एका म्हणजे निद्राविषयक तपस्येची जोड दिली पाहिजे. निद्रेची तपस्या म्हणजे निद्रेचा त्याग करणे असा नव्हे तर निद्रा कशी घ्यावी याचे ज्ञान करून घेणे हा आहे.
शरीर ताजेतवाने न होता उलट अधिक जड, सुस्त बनेल अशी अवचेतनाच्या प्रांतात नेऊन टाकणारी निद्रा असता कामा नये. मित आहार घेतल्याने आणि सर्व तऱ्हेचा अतिरेक टाळल्याने झोपेमध्ये अनेक तास घालविण्याची आवश्यकता कितीतरी कमी होते. तथापि किती वेळ झोप झाली त्यापेक्षा किती चांगली झोप झाली ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. झोपेमुळे खरीखुरी विश्रांती आणि आराम मिळवावयाचा असेल तर झोपण्यापूर्वी साधारणतः एक कपभर दूध किंवा फळाचा रस अथवा कढण (soup) घेणे चांगले; हलके अन्न घेतल्याने शांत झोप लागते. काही असले तरी फार जेवण टाळले पाहिजे. कारण त्यामुळे एकतर सारखी दुःस्वप्ने पडून झोप चाळवते किंवा फार झोप येऊन जडत्व, सुस्ती आणि कंटाळा येतो. पण मन निर्मळ ठेवणे, भावना स्थिर करणे, वासनांचे उद्रेक आणि त्यांच्याबरोबर उत्पन्न होणाऱ्या उर्मी यांना शांत करणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.
झोपावयास जाण्यापूर्वी आपण खूप बोललो असलो किंवा तावातावाने वादविवाद घातला असला किंवा अत्यंत उत्तेजक, रसभरित आणि मनात खळबळ उडवून देणारे पुस्तक वाचले असले तर एकदम झोपी न जाता थोडा वेळ विश्रांती घेणे चांगले होईल. म्हणजे त्यायोगे मनाच्या हालचाली, काहूर, शांत होईल आणि केवळ शरीर झोपी गेले आहे व डोक्यामध्ये मात्र हलकल्लोळ चालला आहे असे होणार नाही.
ज्यांना ध्यान करण्याची सवय असेल त्यांनी झोपण्यापूर्वी काही क्षण, उच्चतर व विशाल जाणिवेप्रत तीव्र आकांक्षा धरून, एखाद्या उच्च आणि शांतिदायक भावदर्शक कल्पनेवर आपले चित्त एकाग्र करणे चांगले; त्यामुळे त्यांची झोप चांगली होईल आणि गाढ झोपी गेले असताना अवचेतनेच्या गर्तेत जाऊन पडण्याची भीती बरीचशी कमी होईल.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 50-52)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024