या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे.
श्रीअरविंदांची शिकवण असे सांगते की, सद्वस्तु आणि चेतना ही जडामध्ये अंतर्हित (involved) आहे. उत्क्रांती ही अशी पद्धती आहे की, जिच्याद्वारे ही सद्वस्तु स्वत:ला मुक्त करवून घेते; जे अचेतन भासते त्यामध्येसुद्धा चेतना प्रकट होते आणि एकदा का ती प्रकट झाली की, उच्च उच्चतर वाढण्याकडे आणि त्याच वेळी जास्तीत जास्त पूर्णत्वाकडे विकसित होण्यासाठी व विस्तारण्यासाठी ती स्वत:ला प्रवृत्त करते.
प्राण ही जाणिवेच्या विमुक्ततेची पहिली पायरी आहे; मन ही दुसरी पायरी आहे; पण उत्क्रांती मनापाशी संपत नाही; तर त्याहून अधिक महान अशा आध्यात्मिक आणि अतिमानसिक जाणिवेमध्ये उत्क्रांत होण्याची ती वाट पाहत राहते. अतिमानसाचे विकसन आणि सचेतन जीवामध्ये आत्मशक्तीचे प्राबल्य हे खचितच उत्क्रांतीचे पुढचे पाऊल असणार आहे. असे झाले तरच, वस्तुजातामध्ये अंतर्हित असणाऱ्या दिव्यत्वाची पूर्णत: मुक्तता होईल आणि जीवनाला त्याचे निर्दोष आविष्करण करणे शक्य होईल.
परंतु प्रकृतिकडून उत्क्रांतीची या आधीची पावलं, वनस्पती आणि प्राणीजीवनाच्या जागृत इच्छाशक्तीच्या सहकार्याविनाच उचलली गेली; मानवामध्ये मात्र, त्याच्या (मन, प्राण, देह) या आधारामध्ये, जागृत इच्छाशक्तीद्वारे विकसन करण्यास प्रकृति समर्थ ठरली आहे. परंतु, मानवामध्ये असलेल्या मानसिक इच्छाशक्तीद्वारेच केवळ हे संपूर्णत: घडून येईल असे संभवनीय नाही, कारण मन हे एका ठरावीक बिंदूपर्यंतच जाऊ शकते आणि त्यानंतर ते एका वर्तुळातच फिरत राहते. असे एक रुपांतरण घडवून आणणे आवश्यक आहे, जाणिवेला असे एक वळण देणे आवश्यक आहे की, ज्यामुळे मन उच्चतर तत्त्वात बदलून जाईल. ती पद्धत प्राचीन काळातील मानसिक शिस्त आणि योगाच्या अभ्यासातून शोधून काढणे गरजेचे आहे. प्राचीन काळी, जगापासून स्वत:ला दूर राखणे आणि ‘स्व’च्या किंवा आत्म्याच्या उच्चतर जाणिवेमध्ये स्वत:चा विलय करून घेणे या मार्गाने हे प्रयत्न झाले आहेत.
श्रीअरविंदांनी अशी शिकवण दिली आहे की, अशा एका उच्चतर तत्त्वाचे (अतिमानस) अवतरण शक्य आहे की, ज्यामुळे आध्यात्मिक ‘स्व’ची मुक्ती केवळ या जगापासून दूर जाऊन नाही तर या जगात राहूनच शक्य होईल. एवढेच नाही तर, त्याच्या अवतरणामुळे मनाच्या अज्ञानाची किंवा मर्यादित, अपुऱ्या ज्ञानाची जागा अतिमानसिक सत्य-जाणीव घेईल की, जी आंतरिक ‘स्व’चे पुरेसे माध्यम असेल आणि ज्यामुळे मानवाला गतिशीलपणे तसेच अंतरंगामध्ये स्वत:चा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अजूनपर्यंत शिल्लक असलेल्या पशुवत मानवतेचे विकसन अधिक दिव्य वंशामध्ये होईल.
ह्या अवतरणाद्वारे होणाऱ्या परिवर्तनासाठी किंवा रुपांतरणासाठी अस्तित्वाची सर्व अंगे खुली करून देणे आणि अजूनही सुप्त असलेल्या उच्चतर अशा अतिमानस तत्त्वाला कार्य करू देणे येथपर्यंत योगाची मानसिक शिस्तबद्ध पद्धती वापरता येणे शक्य आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 547-548)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023