(श्रीमाताजी ‘चार तपस्या व चार मुक्ती’ या पुस्तकातील काही भाग वाचतात.) अंध:कार आणि अचेतनता यांच्यावर ईश्वरी प्रेमशक्तीने आपली पाखर घातली,….वनस्पती-जगतामध्ये या प्रेमाचा स्पष्टपणे प्रादुर्भाव झालेला असतो; आपल्या वाढीसाठी अधिक प्रकाश, अधिक हवा आणि अधिक मोकळी जागा मिळविण्याची वनस्पती व वृक्ष यांच्यामध्ये जी गरज दिसते, ते प्रेमाचेच स्वरूप आहे. फुलांमध्ये दिसणारे त्याचे स्वरूप म्हणजे त्यांच्या प्रेमळ बहरण्यामध्ये सौंदर्य आणि सुगंध यांची उधळण.
प्राण्यांच्या ठिकाणी सुद्धा त्यांची भूक व तहान यांच्यामागे, आपलेसे करण्याच्या, व्यापक होण्याच्या किंवा प्रजोत्पादनाच्या, थोडक्यात म्हणजे सर्वच वासनांच्या मागे कळत अथवा नकळत तेच प्रेम वसत नसते का? आणि उच्च कोटीतील प्राण्यांच्या मध्ये आईच्या ठिकाणी पिलांसाठी जे आत्मत्यागपूर्ण वात्सल्य दिसते त्यामागे तरी काय असते? यानंतर ओघानेच मनुष्यप्राण्याचा विचार येतो. त्याच्या ठिकाणी मानसिक क्रियेच्या विजयी आगमनाबरोबरच या प्रेमाची परमावधी होते; कारण खरोखरी ते तेथे जागृत, जाणीवयुक्त व हेतुपुर:सर असते. पृथ्वीच्या विकासक्रमांत योग्य संधी येताच प्रकृतीने ही प्रेमाची उदात्त शक्ती हाती घेतली आणि प्रजोत्पादनाच्या क्रियेशी तिचा संबंध जोडून, त्यात ती मिसळून टाकून आपल्या निर्मितीच्या कार्यामध्ये या प्रेमशक्तीचा तिने उपयोग करून घेतला…..
वरील उताऱ्याचे विवरण करताना श्रीमाताजी म्हणतात : हे प्रेम माणसांमध्ये वात्सल्याचे रूप घेते. फरक इतकाच की, येथे त्याला स्वत:ची जाणीव असते पण प्राण्यांमध्ये ते माणसांपेक्षादेखील अधिक शुद्धतर असते. प्राण्यांमध्ये त्यांच्या पिल्लांसाठी प्रेम, काळजी, निरपेक्षता यांची अतिशय सुंदर अशी उदाहरणे सापडतात. फक्त एवढेच की हे उत्स्फूर्त असते, विचारपूर्वक केलेले नसते, चिंतनपूर्वक केलेले नसते; प्राणी जी काही कृती करीत असतात त्याचा ते विचार करीत नाहीत. माणूस विचार करतो. बरेचदा त्यामुळेच सारे काही बिघडून जाते. कधीकधी विचारांमुळे त्याला उच्चतर मूल्यदेखील प्राप्त होते पण ही गोष्ट फारच दुर्मीळ असते. माणसामध्ये प्राण्यांपेक्षा कमी उत्स्फूर्तता असते.
माझ्याकडे एक मांजर होती, जेव्हा तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा ती त्यांच्यापासून अजिबात दूर हलू इच्छित नव्हती. ती काही खात नसे, एवढेच काय पण नैसर्गिक विधीसुद्धा करत नसे. ती तिथेच राहायची, पिल्लांना बिलगून, त्यांचे रक्षण करत, त्यांचे पोषण करत; त्यांना काहीतरी होईल अशी तिला भीती वाटत असे. आणि ते काही विचारपूर्वक नव्हते, सहज होते, उत्स्फूर्त होते. तिला सहजप्रेरणेने असे वाटायचे की, त्या पिल्लांना काहीतरी होईल, म्हणून ती इतकी भेदरलेली असे की ती काही हालचालच करीत नसे.
आणि जेव्हा ती पिल्लं मोठी झाली तेव्हा तिने त्यांच्या प्रशिक्षणासाठी इतके कष्ट घेतले – खरोखर आश्चर्यकारक होते. तिच्याकडे केवढा धीर होता. तिने त्यांना या भिंतीवरून त्या भिंतीवर उडी मारायला शिकवावे, अन्न मिळवायला शिकवावे; आणि ते देखील किती काळजीने, तिने एकवार नाही, गरज पडली तर दहा वेळा, शंभरवेळा शिकवले. त्या लहान पिल्लांनी जे करावे असे तिला वाटत होते, ते त्यांना येईपर्यंत तिने कधीच विश्रांती घेतली नाही. अद्भुत शिक्षण! तिने त्या पिलांना भिंतींच्या कडेकडेने घरांवरून चालत जायला शिकविले, कसे चालले की खाली पडणार नाही, एक भिंत आणि दुसरी भिंत ह्यांच्यामध्ये खूप अंतर असले तर ते अंतर ओलांडण्यासाठी काय करावयाचे, सारे सारे शिकविले.
जेव्हा दोन्ही भिंतींमधील खूप मोठे अंतर त्या पिल्लांनी पाहिले तेव्हा ती पिल्ले खूप घाबरली आणि उडी मारण्यास त्यांनी नकार दिला. (वास्तविक खरं तर खूप अंतर होते असेही नाही, पण मध्ये अंतर असल्याने त्यांनी धाडस केले नाही.) आणि मग मांजरीने उडी मारली, ती दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि तेथून पिल्लांना बोलावू लागली : या, इकडे या. पिल्ले अजिबात हलली नाहीत, ती भेदरलेली होती. ती मांजर माघारी आली आणि पिल्लांना भले मोठे भाषण दिले, तिने त्यांना तिच्या पंजांने थापट मारली आणि नंतर चाटू लागली पण तरीसुद्धा ती पिल्ले तिथून हलली नाहीत. तिने उडी मारली. मी पाहिले की, ती हे असे अर्धा तास तरी करत होती. अर्ध्या तासाने तिला असे आढळले की, आता ते पुरेसे शिकले आहेत, त्यातील जे पिल्लू सर्वाधिक तयार झाले आहे असे तिला वाटले त्याच्या पाठीमागे जाऊन ती उभी राहिली, आणि स्वत:च्या डोक्याने त्या पिलाला ढुशी मारली. तेव्हा अगदी सहजप्रेरणेने त्या पिल्लाने उडी मारली. एकदा त्याने उडी मारली मात्र, ते पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा उड्या मारू लागले.
एवढा धीर, एवढी सहनशीलता असणाऱ्या माता विरळ्याच !
– श्रीमाताजी
(CWM 05 : 242-243)
- पूर्णयोगाचे ध्येय - September 6, 2024
- अनुभवांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन - September 5, 2024
- समाधी ही प्रगतीची खूण? - September 4, 2024