योगमार्गावर साधक दीर्घकाळ धीमेपणाने चाललेला असेल, तर त्याच्या हृदयाची श्रद्धा अतिप्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहू शकते; ती काही काळ दडून बसेल, पराभूत झाल्यासारखी दिसेल, परंतु पहिली संधी मिळताच ती पुन्हा प्रकट होईलच होईल.
कारण, जरी साधकाला खूप ठेचकळावे लागले, दीर्घकाळ अपयश आले, तरी या श्रद्धेला हृदय किंवा बुद्धी यांच्याहून श्रेष्ठ अशा तत्त्वाचा आधार असतो. या तत्त्वाच्या आधाराने ती तग धरून राहिलेली असते.
ठेचाळण्याच्या प्रसंगांमुळे, निराशाजनक प्रसंगांमुळे अगदी अनुभवी साधकाची देखील प्रगती मंद गतीने होते आणि नवीन साधकाच्या दृष्टीने तर, हे प्रसंग फारच धोकादायक असतात.
तेव्हा प्रथमपासून ही गोष्ट समजून चालणे आवश्यक आहे की, योगमार्ग हा फार अवघड मार्ग आहे, आणि हा मार्ग धरावयाचा तर श्रद्धा अत्यंत जरुरीची आहे. आपल्या बुद्धीला ही श्रद्धा आंधळी वाटेल; तरी हे लक्षात असू द्यावे की, तर्कविशारद बुद्धीहून ही श्रद्धा अधिक शहाणपणाची असते.
कारण या श्रद्धेला बुद्धीहून श्रेष्ठ अशा तत्त्वाचा आधार असतो; बुद्धी आणि तिच्याकडचे भांडार यांच्या वरती असणारा गुप्त प्रकाश ज्या तेजस्वी छायेने युक्त असतो, ती तेजस्वी छाया म्हणजेच श्रद्धा होय. गुप्त ज्ञानाचे हृदय, हे या श्रद्धेचे खरे स्वरूप असते, त्यामुळे ही श्रद्धा समोरच्या दृश्यांच्या अनुकूल-प्रतिकूलतेवर अवलंबून नसते.
आपली श्रद्धा चिकाटीची असेल, तर ती अंतिमत: तरी यशस्वी ठरेल; तिला उच्च, उन्नत रूप येईल, दिव्य ज्ञान हे रूप तिला येईल, आत्मसाक्षात्कार करून देणारे दिव्य ज्ञान हे ह्या श्रद्धेचे अंतिम स्वरूप असेल.
“योग अखंड केला पाहिजे, योग करताना आपले हृदय निराशेपासून दूर ठेवले पाहिजे; ते निराशेने खचता उपयोगी नाही,” हा गीतेचा आदेश आपण नेहमी पाळला पाहिजे. “सर्व पापांपासून, संकटांपासून मी तुला मुक्त करेन; यात संशय बाळगू नकोस, दुःख करू नकोस,” या गीतोक्त वचनाची आपण आपल्या शंकेखोर बुद्धीला पुनः पुनः आठवण करून दिली पाहिजे.
शेवटी, श्रद्धेची होणारी चलबिचल कायमची बंद होईल, कारण, आपल्याला ईश्वराचे दर्शन घडेल आणि आपल्याला सदासर्वदा त्याच्या सानिध्याचा लाभ घडेल.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 245)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023