ईश्वराशी पूर्ण तादात्म्य पावण्याइतकी आमची साधना पूर्णत्वाला जाण्यापूर्वीही ईश्वराची इच्छा आमच्या ठिकाणी अंशतः साकार होऊ शकते. अशावेळी ती इच्छा ‘अनिवार प्रेरणा’, ‘ईश-प्रेरित कर्म’ ह्या स्वरुपात आमच्या प्रत्ययास येते; अशा प्रत्येक वेळी एक उत्स्फूर्त स्वयंनिर्णायक शक्ती आमच्याकडून कार्य करवून घेत आहे अशी जाणीव आम्हाला होते; परंतु त्या कार्याचा अर्थ काय, त्याचे प्रयोजन काय याबाबतचे पूर्ण ज्ञान आम्हाला नंतर केव्हातरी प्राप्त होते.
ईश्वरेच्छा ‘अनिवार प्रेरणा’, ‘ईश-प्रेरित कर्म’ ह्या स्वरुपात तरी प्रत्ययास येते अन्यथा ती ‘अंत:स्फूर्तीच्या’ रूपाने येते, ‘अंतर्ज्ञानाच्या’ रूपाने येते; ही अंत:स्फूर्ती, हे अंतर्ज्ञान मनात उदयास येत नाही, तर ते हृदयांत उदय पावते, शरीरात उगम पावते. येथे एका परिणामकारक दृष्टीचा प्रवेश होतो परंतु संपूर्ण आणि अचूक ज्ञान हे अजूनही दूरच असते, आणि ते ज्ञान झालेच तर ते खूपच नंतर होते.
ईश्वरेच्छा खाली उतरून आमच्या ठिकाणी प्रकट होण्याचे आणखीही प्रकार आहेत : एकच स्वच्छ प्रकाशपूर्ण आदेश, काय करावयाचे त्यासंबंधीची पूर्ण कल्पना आणि अखंड कल्पनामालिका. हा आदेश, ही कल्पना किंवा कल्पनामालिका आमच्या इच्छाक्षेत्रात किंवा विचारक्षेत्रात येते किंवा वरून आलेल्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात येते; आणि आमच्यामधील कनिष्ठ घटक हा आदेश वगैरे स्वयंस्फूर्तीने अमलात आणतात.
योग अपूर्ण आहे तोपर्यंत, काही थोडी कामे अशा रीतीने होऊ शकतात, किंवा सर्वसाधारण कर्म या रीतीने होऊ शकते – पण साधकाच्या प्रकाशपूर्ण उच्चतम अवस्थेतच हे सर्व होऊ शकते. योग पूर्ण झाला म्हणजे मात्र, साधकाचे सर्वच कर्म अशा प्रकारचे होते.
या बाबतीत चढत्या वाढत्या प्रगतीच्या तीन अवस्था सांगता येतील :
पहिल्या अवस्थेत व्यक्तीची जी वैयक्तिक इच्छा असते, तिला ईश्वरेच्छेकडून, ज्ञानयुक्त शक्तीकडून, मधून मधून किंवा वारंवार प्रकाश मिळतो, प्रेरणा मिळते; ह्या अवस्थेत आपल्यावर अजूनही बुद्धी, हृदय आणि इंद्रिये यांची सत्ता चालत राहते; या आपल्या अंगांना ईश्वरी स्फूर्तीसाठी, मार्गदर्शनासाठी वाट पाहावी लागते, प्रयत्न करावा लागतो परंतु हे मार्गदर्शन, ही स्फूर्ती नेहमीच आपल्याला लाभते असे नाही.
दुसऱ्या अवस्थेत, ईश्वरेच्छा वैयक्तिक इच्छेची जागा पुन:पुन्हा घेत असते; ह्या अवस्थेत मानवी बुद्धीची जागा अधिकाधिक प्रमाणात प्रकाशपूर्ण किंवा स्फूर्तिपूर्ण आध्यात्मिक मन घेते; बाह्य मानवी हृदयाची जागा आंतरिक चैत्य हृदय घेते; इंद्रियजन्य जाणिवांची जागा शुद्ध नि:स्वार्थी प्राणशक्ती घेते.
तिसऱ्या अवस्थेत, ईश्वरी इच्छाशक्तीमध्ये वैयक्तिक इच्छा विलीन होते, एकरूप होऊन जाते. आणि आध्यात्मिक मनाच्या वरती चढून आपला अतिमानसिक क्षेत्रात प्रवेश होतो.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 218-219)
- रूपांतरण हे उद्दिष्ट - May 27, 2022
- त्रिविध तपस्या - May 26, 2022
- आत्म-प्राप्ती हेच रहस्य - May 17, 2022