मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती (कर्मशक्ती), ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत; मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी चढत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मानवाचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व होणे हाच पूर्णयोगाचा पाया असला पाहिजे.
जीवनात पहिली शक्ती कर्म ही आहे. प्रकृती ही ह्या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्ये मानवामध्ये जाणिवेने युक्त होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते; म्हणून मानवाने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि हमखास दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे.
जेव्हा मानवातील संकल्पशक्ती ही ईश्वरी संकल्पशक्तीशी एकजीव होते आणि जीवाची समग्र कर्म ही एका ईश्वरातूनच उदित होऊ लागतात, तसेच ती त्या ईश्वराप्रतच जाऊ लागतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते.
परंतु, खुद्द कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये आहे. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून परत ज्ञानामध्ये परिसमाप्त होते.
आपण आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये एकत्व पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या जाणीवयुक्त जीवाशी एकजीव होतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या जीवाशी आपण तादात्म्य पावतो.
या तादात्म्याचा, ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम, भक्ती होय. ज्या ईश्वराच्या पोटात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, ज्याच्यामुळे आपण जिवंत असतो, आणि ज्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, ज्याच्यासाठीच जगायचे असते हे अंततः आपल्याला उमगते, त्या ईश्वराशी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते.
आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच होय. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून आपण कर्मापासून प्रारंभ केला तर, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.
श्रीअरविंद
(CWSA 24 : 545-546)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023