योगसाधनेमध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत जेव्हा साधक जाऊन पोहोचतो तेव्हा, म्हणजे जेव्हा त्याचे मन बरेचसे शांत झालेले असते आणि जेव्हा ते स्वत:च्या मानसिक धारणांची खात्री पुरेशी आहे असे समजून प्रत्येक पावलागणिक स्वत:चेच समर्थन करत बसत नाही; जेव्हा प्राणदेखील स्थिर झालेला असतो, नियंत्रणात असतो आणि स्वत:च्या उतावळ्या इच्छेबाबत, मागण्यांबाबत व वासनेबाबत सतत हट्टाग्रही असा राहत नाही; जेव्हा शरीरतत्त्वही पुरेसे बदलले असते म्हणजे असे की, स्वत:चा बहिर्मुखपणा, अंध:कारमयता वा जडतेच्या ओझ्याखाली आंतरिक ज्योती ते संपूर्णपणे विझवून टाकत नाही; तेव्हा मग प्रदीर्घ काळपर्यंत अंतरंगात दडून असलेले अन्तरतम तत्त्व, ज्याच्या अगदी दुर्लभ अशा प्रभावातून त्याचे अस्तित्व जाणवायचे ते तत्त्व पुढे येऊ शकते आणि तेव्हा ते अस्तित्वाच्या उर्वरित अंगांना उजळवून टाकते आणि साधनेचे नेतृत्व हाती घेते.

या तत्त्वाचे खास लक्षण हेच की, ईश्वर किंवा पुरुषोत्तम हे याचे एकमेव साध्य असते; या साध्याकडे ते एकाग्रतेने वाटचाल करीत असते; हे तत्त्व या प्रमाणे एकाग्र, एकोन्मुख असले तरी, त्यांची कृती व गती लवचिक असते. या तत्त्वाचे ठायी एककल्ली बुद्धीचा दुराग्रह किंवा एखाद्या शासक कल्पनेची कट्टरता, किंवा एककल्ली प्राणिक शक्तीप्रमाणे भावावेग या गोष्टी नसल्याने, ते तत्त्व मार्गाचा साचेबंदपणा निर्माण होऊ देत नाही.

ते आत्मतत्त्व दर क्षणाला आणि पुरेशा खात्रीने सत्याच्या मार्गाकडे निर्देश करते; त्यामुळे आपोआपच त्या तत्त्वाला, खोट्या पावलाहून योग्य पाऊल वेगळे कसे काढायचे, अदिव्य भेसळयुक्त कृतीला चिकटून राहून केलेल्या कृतीपासून ईश्वराभिमुख वा दिव्यत्वाकडे वळलेली कृती वेगळी कशी ओळखायची ह्याची जाण असते.

या आत्मतत्त्वाची कृती शोधक प्रकाशझोताप्रमाणे असते; आमच्या प्रकृतीत कोठे काय बदल आवश्यक आहे ती गोष्ट ते आत्मतत्त्व तत्काळ दाखवते. त्याच्या ठिकाणी पूर्णतेचा आग्रह धरणारी इच्छाशक्ती असते, आमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचा किमयावत कायापालट व्हावा, असा त्याचा आग्रह असतो.

त्याला सर्वत्र ईश्वरतत्त्व दिसते; ईश्वरत्वाला झाकणारे मुखवटे व वेष ते तत्काळ ओळखते व दूर सारते. त्याला सत्य हवे असते; इच्छाशक्ती, सामर्थ्य, प्रभुत्व त्याला हवे असते; आनंद, प्रेम, सौंदर्य त्याला हवे असते; परंतु त्याला सत्य हवे असते ते, चिरस्थायी ज्ञानाचे; क्षणिक व्यवहारापुरते असलेले अज्ञानाचे सत्य त्याला नको असते. त्याला आनंद हवा असतो, तो आंतरिक आनंद; केवळ प्राणिक, वासनिक सुख त्याला नको असते; अधम सुखापेक्षा चित्तशुद्धी करणारे दु:ख तो पसंत करतो; त्याला प्रेम हवे असते पण ते, ऊर्ध्वमुख, ईश्वरोन्मुख प्रेम हवे असते; अहंभावाच्या वासनेला बांधलेले, चिखलात फसलेले प्रेम नको असते. त्याला शाश्वत पुरुषोत्तमाचे अंतरंग दाखविण्याचे पूजाकर्म परत हाती घेतलेले सौंदर्य हवे असते; त्याला इच्छाशक्ती, सामर्थ्य, प्रभुत्व हवे असते, ते परमात्म्याची सेवा करणारे हवे असते, अहंभावाची सेवा करणारे सामर्थ्य, प्रभुत्व नको असते. जीवन दिव्यतामय करावे, जीवनाच्या द्वारा महान सत्य अभिव्यक्त केले जावे; तसेच ते जीवन शाश्वताला, ईश्वराला समर्पित केले जावे अशी त्याची इच्छा असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 154-155)

श्रीअरविंद