पूर्णयोगाचा साधक जीवन मान्य करीत असल्याने त्याला स्वतःचे ओझे तर वाहावे लागतेच; पण त्याबरोबर जगातीलही पुष्कळसे ओझे वाहावे लागत असते. त्याचे स्वतःचे ओझे काही कमी नसते; पण या बऱ्याचशा जड ओझ्याबरोबरच त्याला जोडून असणारे असे जगाचेही बरेचसे ओझे त्याला वाहावे लागत असते. म्हणून दुसरे योग लढ्याच्या स्वरूपाचे वाटत नसले, तरी हा पूर्णयोग मात्र पुष्कळसा लढ्याच्याच स्वरूपाचा असतो; मात्र हा लढा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नसतो; ते जणू सामुदायिक युद्धच असते आणि त्याचे क्षेत्रही मोठे असते.
अहंकारी खोटेपणाच्या व अव्यवस्था निर्माण करणाऱ्या त्याच्या स्वत:तील शक्ती तर त्याला जिंकाव्याच लागतातच पण एवढ्यानेच भागत नाही; या शक्ती जगातील तत्सम विरोधी व अमर्याद शक्तींच्या प्रतिनिधी या नात्याने त्याच्यामध्ये अस्तित्वात असतात तेव्हा या भूमिकेतूनही पूर्णयोगाच्या साधकाने त्यांच्यावर विजय प्राप्त करणे आवश्यक असते. त्याच्या ठिकाणी विरोधाचे काम करणाऱ्या प्रतिनिधीभूत शक्तीचे प्रातिनिधिक स्वरूप त्यांना विरोधाची लवकर न थकणारी शक्ती देत असते, पुनः पुनः विरोधात उभे राहण्याचा जवळजवळ अमर्याद असा हक्क त्यांना देत असते.
या साधकाला पुष्कळ वेळा असे आढळून येते की, त्याने आपला वैयक्तिक लढा चिकाटीने जिंकल्यावर देखील, त्याला पुनः पुनः तोच तो लढा जिंकणे भाग पडते. जणू त्या विरोधी शक्तींबरोबर त्याचे कधी न संपणारे युद्धच चालू असते. याचे कारण, त्याचे आंतरिक अस्तित्व व्यापक झालेले असते. या व्यापक अस्तित्वात त्याचे स्वतःचे विशिष्ट गरजांचे व अनुभवांचे वैयक्तिक अस्तित्व असतेच पण त्याबरोबर इतरांचे अस्तित्वही असते; त्याच्या ठिकाणी सर्व विश्व सामावलेले असते.
आत्म्याच्या इतर साधकांप्रमाणे या पूर्णयोगाच्या साधकाला अनेक समस्यांचे समाधान करणे प्राप्त असते; बुद्धीचा नाना प्रकारचा विरोध, इंद्रियांची आपापल्या विषयांवरील घट्ट पकड, हृदयाची घालमेल, वासनांचे चोरून होणारे हल्ले, शरीराच्या जड धोंड्याची अडचण या सर्व अडचणींतून, आत्म्याच्या इतर साधकांप्रमाणे पूर्णयोगाच्या साधकालाही मार्ग काढावयाचा असतो; परंतु इतर साधकांसारखे वागून पूर्णयोगाच्या साधकाचे चालत नाही; त्याला इतर साधकांहून वेगळ्या तऱ्हेने आपला मार्ग काढावा लागतो. या बुद्धीच्या, हृदयाच्या वगैरे आपापसांतील आंतरिक लढाया त्याला इतरांहून वेगळा तऱ्हेने हाताळाव्या लागतात; याचा त्याच्या साध्याला जो विरोध होतो तो मोडून काढण्याचा याचा मार्ग इतर साधकांहून वेगळा असावा लागतो; कारण त्याला इतरांहून अनंत पटींनी अधिक अवघड अशी पूर्णता संपादन करावयाची असते व त्याला विरोध करणाऱ्या बंडखोर शक्तींना योग्य रीतीने हाताळून ही पूर्णता त्याला साधावयाची असते.
दिव्य अनुभूतीसाठी आणि अभिव्यक्तीसाठी साधने म्हणून बुद्धी, इंद्रिये, हृदय इत्यादी सर्व गोष्टी वापरावयाच्या असे या पूर्णयोगाच्या साधकाने ठरविले असल्याने त्याला त्यांच्या संबंधात पुष्कळच काम करावयाचे असते : त्यांच्यामध्ये असलेले विसंवाद दूर करावयाचे असतात, त्यांच्यामधील घनदाट अंधकार दूर करावयाचा असतो, त्यांना व्यक्तिशः व संघश: रूपांतरित करावयाचे असते, त्यांच्यात प्रत्येकात सुसंवाद निर्माण करून, त्यांचा परस्परांशीही मेळ घालावायचा असतो, हे सर्व सर्वांगीण दृष्टीने करावयाचे असते, त्यांच्यामधील एकही कण, एकही धागा, एकही स्पंदन वगळावयाचे नसते; कोठेही कसलीही अपूर्णता राहणार नाही, अशा तऱ्हेने हे सर्व करावयाचे असते, त्याचे हे काम पुष्कळच गुंतागुंतीचे असते. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे किंवा क्रमाने प्रत्येक गोष्टीवर सर्व लक्ष केंद्रित करीत करीत मार्ग चालणे हे त्याच्या गुंतागुंतीच्या व्यापात तात्पुरत्या सोयीचे काम म्हणूनच मानले जाते; या कामाची उपयुक्तता संपली की, ते टाकून द्यावे लागते; सर्वसमावेशक केंद्रीकरण हे अवघड काम त्याला साधावयाचे असते, यासाठी त्याला परिश्रम करावयाचे असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 77-78)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५४ - February 16, 2025
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025