आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर नैतिक आणि आध्यात्मिक आहे. केवळ शासनाच्या प्रकारामध्ये बदल घडविणे हेच आमचे उद्दिष्ट नसून राष्ट्रबांधणी हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कामाचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच !
केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आम्ही स्वत:ला वाहून घेता कामा नये तर या सर्वांचा समावेश आम्ही ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आम्ही समर्पित झाले पाहिजे.
जीवनाचा एक थोर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचा देह आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे हे भारताचे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माचा बांधा, आराखडाच मोठ्या प्रमाणात गमावला आहे असे नाही तर त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यत्वच गमावले आहे.
जर हा भारताचा धर्म आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच नव्हे. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो जीवनाच्या सर्वांगांत उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आपल्या आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट व्हायला पाहिजे.
ह्या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने कर्मयोग होय.
आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24-28)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023