श्रीअरविंदांचे उत्तरपारा येथील भाषण

श्रीअरविंद भाषण देताना

(अलीपूर बॉम्बकेस मधून श्रीअरविंदांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यानंतर उत्तरपारा येथे, धर्म रक्षिणी सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दि ३० मे १९०९ रोजी श्रीअरविंद यांनी जे भाषण केले, ते ‘उत्तरपाराचे भाषण’ म्हणून प्रसिद्ध आहे. काल म्हणजे दि ३० मे २०२० रोजी ह्या भाषणाला १११ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने येथे ते भाषण देत आहोत.)

*

तुमच्या संस्थेच्या वार्षिक समारंभाचे वेळी भाषण करावे म्हणून जेव्हा मला विनंती करण्यात आली, तेव्हा आजच्यासाठी निवडलेल्या ‘हिंदुधर्म’ ह्या विषयावर दोन शब्द सांगावे असा माझा हेतू होता. तो हेतू सफल होईल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही कारण येथे बसलो असताना मला एक आदेश मिळाला तो मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हालाच काय, पण सर्व हिंदुराष्ट्राला सुद्धा तो आदेश मी सांगणार आहे. मला हा आदेश प्रथमत: तुरुंगामध्ये झाला व तो माझ्या देशवासीयांना कळविण्यासाठी मी तुरुंगाच्या बाहेर आलो आहे.

सुमारे एक वर्षापूर्वी मी येथे आलो होतो. त्यावेळी मी एकटा आलो नव्हतो. राष्ट्रधर्माचे एक महान उपदेशक (बिपिनचंद्र पाल) माझ्या बरोबर होते. तुरुंगातील एकांतवासातून नुकतेच ते बाहेर आले होते. देवाच्या मनातून तुम्हाला जो निरोप सांगावयाचा होता तो त्यांनी शांततेत आणि एकान्तवासामध्ये ऐकावा एवढ्यासाठीच देवाने त्यांना एकान्तवासात पाठविले होते. त्यांचे स्वागत करण्याकरता तुम्ही शेकडोजण त्यावेळी आला होता. आता ते आपल्यापासून शेकडो मैल दूर आहेत. इतर जे माझ्या समवेत काम करीत तेही आज येथे दिसत नाहीत. देशात झालेल्या राजकीय उलथापालथीने त्यांना दूर आणि लांबवर विखरून टाकले आहे. एक वर्ष एकांतवासामध्ये राहून आज मी तुमच्या पुढे आलो आहे.

बाहेर आल्यावर मला सर्व परिस्थिती बदललेली दिसली. जे नेहमी माझ्या शेजारी बसत आणि माझ्या कार्यात सहभागी होत ते ब्रह्मदेशात कैदी म्हणून आहेत (लोकमान्य टिळक); दुसरे एकजण उत्तर हिंदुस्थानात अटकेत आहेत. बाहेर आल्यावर मी चहूकडे दृष्टि फेकली. ज्यांचेकडून मला सल्ला व प्रेरणा मिळत असे ते कोठे आहेत म्हणून मी पाहू लागलो. पण मला ते दिसले नाहीत. ह्याशिवाय आणखी काही गोष्टी घडल्या होत्या.

मला तुरुंगात टाकले त्या वेळी सर्व देश ‘वंदेमातरम्’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. अधोगतीतून नुकत्याच वर आलेल्या लाखो लोकांची आशा त्या वंदेमातरम् च्या गर्जनांतून निदर्शनास येत होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर वंदेमातरम् च्या त्या गर्जना कानी पडत आहेत का ह्याकडे मी लक्ष दिले. पण मला त्या ऐकू आल्या नाहीत. त्या ऐवजी जिकडे तिकडे सामसूमच आढळून आली. देशात सर्वत्र शांतता पसरली होती, आणि लोक गोंधळल्यासारखे दिसले. कारण आपणापुढे ईश्वरी तेजाने प्रकाशलेले व भावी सुस्थितीचे द्योतक असे निरभ्र आकाश सर्वत्र दिसत असताना, एकाएकी त्यांत काळेकुट्ट ढग येऊन गडगडाट होऊ लागला आणि विजेच्या क्षणभंगुर चमकांनी सर्वांचे डोळे दिपून गेले. कोणालाही कोणत्या मार्गाने जावे हे समजेना. चहूबाजूंनी सर्वांपुढे एकच प्रश्न उभा राहिला की, ‘‘आता पुढे काय करावे ? आम्हाला करता येण्याजोगे असे काय आहे ?’’

मलाही समजेना की कोणत्या मार्गाने जावे, पुढे काय करावे. पण एक गोष्ट मला माहीत होती; ती ही की, ज्या सर्वशक्तिमान परमेश्वरी शक्तीने ती गर्जना केली होती, ती आशा निर्माण केली होती, त्याच शक्तीने ही सामसूमही पसरविली आहे. गर्जना आणि चळवळ ह्यामध्ये जो ईश्वर होता तोच विराम आणि शांतता ह्यामध्येही आहे. राष्ट्राने क्षणभर थांबून स्वत:च्या अंत:करणात पाहावे, आणि तेथे निवास करणाऱ्या परमेश्वराची इच्छा काय आहे ती समजून घ्यावी एवढ्यासाठी परमेश्वराने ही शांतता पसरविली आहे. ह्या शांततेने मी नाउमेद झालो नाही. कारण तुरुंगामध्ये शांततेशी माझा चांगला परिचय झाला आहे. क्षणभर मागे सरून स्वत:च्या अंत:करणात पाहावे आणि देवाची इच्छा काय आहे ती समजून घ्यावी हा धडा मी स्वत:च संबंध एक वर्षाच्या तुरुंगवासामध्ये सर्वत्र शांतता आणि सामसूम ह्यांचे साम्राज्य पसरले असताना शिकलो आहे.

बिपिनचंद्र पाल तुरुंगातून बाहेर आले, ते एक ईश्वरप्रेरित संदेश घेऊनच. त्यांनी ह्या ठिकाणी केलेले भाषण मला आठवत आहे. त्या भाषणाचा रोख व उद्देश विशेषसा राजकीय नसून धार्मिकच होता. त्यांना तुरुंगात झालेल्या साक्षात्काराबद्दल ते बोलले. आपणा सर्वांमध्ये परमेश्वर आहे हे त्यांनी सांगितले. व्यक्तीमध्ये जसा ईश्वर आहे तसा तो राष्ट्रामध्येही आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतरच्या इतर भाषणांमधून सुद्धा त्यांनी सांगितले की, ह्या चळवळीत सामान्य सामर्थ्यापेक्षा असामान्य सामर्थ्य असून, तिचे साध्यही मोठे व असामान्य आहे. आज मी तुमच्या पुढे उभा आहे. मी देखील तुरुंगातून बाहेर आलो आहे आणि पुन्हा तुम्ही उत्तरपाराचेच रहिवाशी, राजकीय सभेमध्ये नव्हे तर, आपल्या धर्माचे रक्षण करण्याकरता स्थापिलेल्या संस्थेच्या सभेत, माझे स्वागत करण्यात पहिले आहात. जो संदेश बिपिनचंद्र पालांना बक्सारच्या तुरुंगात मिळाला, तोच मला ईश्वराने अलीपूरच्या तुरुंगात दिला. माझ्या बारा महिन्यांच्या तुरुंगवासात ईश्वराने मला जे ज्ञान दिले, ते तुम्हाला सांगण्याची ईश्वराने मला आज्ञा केली आहे व ते सांगण्याकरताच मी तुरुंगाच्या बाहेर आलो आहे.

मी सुटून येणार हे मला माहीत होते. अटकेचे एक वर्ष एकांतवास व अभ्यास ह्यासाठीच केवळ होते. ईश्वराच्या हेतुनुरुप जितका वेळपर्यंत राहणे आवश्यक होते त्यापेक्षा अधिक वेळपर्यंत मला कोण तुरुंगात ठेवू शकणार ? ईश्वराने माझ्या बरोबर एक संदेश दिला होता आणि माझ्यावर एक काम सोपविले होते; आणि जोपर्यंत तो संदेश पोहचविला नाही तोपर्यंत कोणतीही मानवी शक्ति मला गप्प बसवू शकणार नाही हे मला माहीत होते. तसेच ईश्वराचे ते कार्य केले नाही तोपर्यंत ईश्वराच्या साधनमात्राला कोणीही अडवू शकणार नाही, मग तो कितीही दुर्बल असो वा लहान असो. मी आता बाहेर आलो आहे. येथे आल्यानंतर काही मिनिटातच मला दोन शब्द सुचले आहेत. ते सांगण्याची माझी आधी इच्छा नव्हती. जे सांगायचे मी ठरवून आलो होतो ते ईश्वराने माझ्या मनातून पार काढून टाकले आहे आणि जे आता बोलणार आहे ते केवळ दैवीस्फूर्तीने व ईश्वरेच्छेने बोलणार आहे.

ज्यावेळी मला पकडून लालबझार पोलीस ठाण्यावर नेण्यात आले तेव्हा क्षणभर माझी श्रद्धा डळमळली कारण ईश्वरी इच्छा मला समजेना. क्षणभर मी स्तंभित झालो आणि माझ्या अंत:करणात ईश्वराला म्हटले, ‘‘माझ्या बाबतीत हे काय घडले ? माझ्या देशातील लोकांकरता कार्य करण्यात जीवन व्यतीत करावे असे मी म्हणत होतो व ते कार्य पुरे होईपर्यंत तू माझे रक्षण करशील असा माझा विश्वास होता. तर मग मी येथे का ? आणि असला आरोप माझ्यावर काय म्हणून ?’’

एक दिवस गेला, दोन दिवस गेला, तीन दिवस गेले, नंतर माझ्या आतूनच आवाज आला, ‘‘स्वस्थ रहा आणि पहा. ’’ तेव्हा मी शांत होऊन स्वस्थपणे वाट पाहू लागलो. मला लालबझारहून अलीपूरला नेण्यात आले व एक महिन्याकरता लोकांपासून दूर अशा एकांत कोठडीत ठेवण्यात आले. तेथे मी माझ्या अंतरीच्या परमेश्वराच्या शब्दाची अहोरात्र वाट पाहिली. ईश्वर मला काय सांगणार आहे, मला काय कार्य करावयाचे आहे हे समजावे म्हणून वाट पाहिली. ह्या एकांतवासामध्ये मला अगदी सुरुवातीलाच ईश्वराचा साक्षात्कार झाला आणि पहिला धडा मिळाला.

त्या वेळेस मला आठवण झाली की, माझ्या अटकेच्या सुमारे एक महिन्यापूर्वी सर्व उद्योग बाजूला ठेवून मी एकांतवासात जावे व स्वत:च्या अंतरंगात बघावे अशी मला आज्ञा झाली होती. म्हणजे अशा रीतीने तरी माझे ईश्वराशी अधिक सान्निध्य व्हावे. पण मी दुर्बल ठरलो आणि त्या आज्ञेप्रमाणे वागू शकलो नाही. माझे चालू कामच मला जास्त प्रिय वाटे. शिवाय अंत:करणातील अभिमानामुळे मला वाटले की, माझ्याविना कार्याचे नुकसान होईल, इतकेच नव्हे तर, त्यात अपयश येईल किंवा ते थांबेल; म्हणून ते माझ्याकडून सोडवेना.

ईश्वराने पुन्हा मला सांगितले, ‘‘जी बंधने तोडण्याचे तुला सामर्थ्य नव्हते ती तुझ्याकरता मी तोडली आहेत. कारण तू करीत आहेस ते काम तसेच चालू रहावे अशी माझी इच्छा नाही आणि हेतूही नाही. मला तुझ्याकडून दुसरीच गोष्ट करून घ्यावयाची आहे. ती गोष्ट तुला स्वत:ला शिकता येणार नाही म्हणून तुला येथे आणले आहे. माझ्या कार्यासाठी शिक्षण देण्यास मी तुला येथे आणून ठेवले आहे.’’

नंतर ईश्वराने माझ्या हातात गीता ठेवली. ईश्वरी शक्ती माझ्यांत शिरली आणि मी गीतोक्त साधना करू लागलो. श्रीकृष्णाची अर्जुनाकडून काय मागणी होती आणि ईश्वराचे कार्य करण्याची जे आकांक्षा ठेवतात त्यांच्याकडून ईश्वर ज्या गोष्टीची अपेक्षा करतो, ती गोष्ट नुसत्या बुद्धिनेच समजून माझे चालणार नव्हते तर, त्याचा मला अनुभव येण्याची जरुर होती. ती गोष्ट कोणती म्हणाल तर ती म्हणजे, तिटकारा आणि इच्छा यापासून मुक्त होणे; फलाची आशा न ठेवता, ईश्वराकरता कार्य करीत राहणे; स्व-इच्छेचा त्याग करून, त्याच्या हातचे केवळ निमित्तमात्र होणे, विश्वासू साधन बनणे; लहान व मोठा, मित्र आणि शत्रू, यशापयश या सर्वाविषयी समचित्त असणे व इतके करूनही, त्याचे कार्य निष्काळजीपणे न करणे, ही होय.

हिंदुधर्म म्हणजे काय ह्याचे मला ज्ञान झाले. आपण नेहमी हिंदुधर्मासंबंधी बोलतो, परंतु खरे म्हणजे आपल्यापैकी फारच थोड्यांना धर्म म्हणजे काय याची कल्पना असते. दुसरे धर्म ‘धर्मावर विश्वास ठेवा,’ ‘धर्माला मान्यता द्या,’ ह्या गोष्टीवरच भर देतात. परंतु सनातन धर्म म्हणजे प्रत्यक्ष आचरण्याचा धर्म आहे. हा नुसता विश्वास ठेवण्याचा धर्म नसून, तो जन्मभर आचरण्याचा धर्म आहे. मानवजातीला आपला उद्धार करून घेता यावा म्हणून जगापासून अलिप्त असलेल्या ह्या द्वीपकल्पात प्राचीन काळापासून त्याची वृद्धि झाली आहे. हा धर्म मानवजातीला देण्याकरता आता हिंदुस्थानचा अभ्युदय होत आहे. इतर राष्ट्रांप्रमाणे स्वत:च्या भरभराटीकरता अथवा स्वत: सामर्थ्यशाली झाल्यावर, दुर्बलांना चिरडण्याकरता त्याचा अभ्युदय होत नाही. जे शाश्वत ज्ञान त्याच्या स्वाधीन केलेले आहे, ते सर्व जगाला देण्यासाठी हिंदुस्थान उदयास येत आहे. हिंदुस्थानचे जीवितच सर्वदा मानवजातीच्या कल्याणाकरता आहे. स्वत:करता नव्हे; आणि मानवजातीच्या हिताकरताच, स्वत:करता नव्हे. हिंदुस्थान उन्नत होणे अवश्यही आहे. हे ईश्वराने मला दर्शवून दिले आणि मला हिंदुधर्माच्या तत्त्वांचीही ओळख करून दिली.

तुरुंगावरील अधिकाऱ्यांची मने त्याने माझ्याकडे वळविली आणि त्यांनी प्रमुख इंग्रजी अधिकाऱ्याला सांगितले, ‘‘असल्या बंदिवासात त्यांचे हाल होत आहेत; सकाळ संध्याकाळ निदान अर्धा तास तरी त्यांना खोलीच्या बाहेर फिरू द्यावे. ’’ त्याप्रमाणे व्यवस्था झाली व मी बाहेर फिरू लागलो. बाहेर फिरत असताना पुन्हा ईश्वरी शक्ती माझ्यात शिरली.

लोकांपासून एकीकडे मला अडकवून ठेवणाऱ्या तुरुंगाकडे मी पाहू लागलो, तो तुरुंगाच्या उंच भिंतींनी मला कोंडले आहे, असे दिसेना तर, माझ्याभोवती सर्व बाजूंनी वासुदेवच उभा असलेला दिसू लागला. माझ्या खोलीपुढील वृक्षाच्या शाखांखाली मी फिरत होतो, परंतु मला तो वृक्ष दिसेना तर, वासुदेव तेथे दिसू लागला. त्या ठिकाणी श्रीकृष्ण उभा असून, माझ्यावर आपली सावली पसरीत आहे असे मला दिसले. मी माझ्या खोलीच्या लोखंडी गजांकडे पाहिले. तेथेही मला पुन्हा वासुदेवच दिसू लागला. खोलीच्या बाहेर वासुदेव उभा असून, तोच पहारेकऱ्याचे काम करीत आहे असे मला दिसले. मला बिछाना म्हणून दिलेल्या खरबरीत कांबळ्यावर मी निजलो तो मला माझा सखा आणि प्रेमी श्रीकृष्ण ह्याचे बाहूच माझ्याभोवती आहेत असे वाटले.

ईश्वराने मला जी अंतर्दृष्टी दिली त्याचा पहिला उपयोग असा झाला की, मी तुरुंगातील कैद्यांकडे चोर, दरोडेखोर, खुनी इसमाकडे पाहिले आणि मला वासुदेवाचे दर्शन झाले. नारायणच मला त्या तमोमय जीवांमध्ये व दुर्वर्तनी शरीरांमध्ये दिसला. त्या चोर व दरोडेखोरांमध्ये काही तर असे होते की, त्यांनी आपल्या सहानुभूतीने, प्रेमळपणाने आणि कठीण प्रसंगी उत्पन्न होणाऱ्या सहृदयतेने मलाच खाली पहावयास लावले. त्यांच्यामध्ये माझ्या देशातील एक निरक्षर असा शेतकरीही होता. त्याला दरोडेखोर म्हणून दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. तो तर मला साधुपुरुषच वाटला. ज्याला आम्ही आमच्या खोट्या वर्ग विषयक अभिमानात येऊन, कनिष्ठ वर्ग म्हणून म्हणतो त्या वर्गातला तो एक होता. पुन्हा एकदा ईश्वर मला म्हणाला, ‘‘ह्या लोकांकडे पहा. ह्यांच्यामध्ये माझे थोडेसे कार्य करण्याकरता मी तुला पाठविले आहे. ज्या राष्ट्राला मी उदयास आणीत आहे, ते राष्ट्र अशा प्रकारचे तत्त्वशील, साधु-वृत्तीचे आहे; व म्हणूनच मी त्याचा उदय करीत आहे.’’

खालच्या कोर्टात खटला सुरु होऊन, जेव्हा आम्हाला मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले तेव्हाही माझी ती दिव्यदृष्टि टिकून होती. ईश्वर मला म्हणाला, ‘‘जेव्हा तुला तुरुंगात टाकले तेव्हा तू अंत:करणात निराश होऊन मलाच हाक मारून म्हणाला नाहीस का, की ‘तुझे संरक्षण कुठे आहे ?’ तर पहा आता ह्या मॅजिस्ट्रेटकडे, पहा त्या सरकारी वकिलाकडे. ’’ मी मॅजिस्ट्रेटकडे पाहिले आणि मला मॅजिस्ट्रेट न दिसता, त्याच्याजागी वासुदेवच दिसू लागला. खुर्चीत नारायणच बसलेला दिसू लागला. मी सरकारी वकिलाकडे पाहिले, तो मला सरकारी वकील दिसला नाही तर वकिलाऐवजी श्रीकृष्णच तेथे बसलेला दिसला. माझा सखा आणि प्रेमी तेथे बसला होता आणि स्मित हास्य करीत मला विचारू लागला, ‘‘अजून तुला भीती वाटते ? अरे, सर्व माणसांच्या हृदयात मीच वास करतो आणि त्याचे आचार, विचार, बोलणे इत्यादिकांवर मी आपली सत्ता चालवितो. मी तुझा पाठीराखा आहे, म्हणून तुला भिण्याचे कारण नाही. तुझ्या विरुद्ध लावलेला हा खटला माझ्या हातात सोपवून दे. तू त्याकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस. हा खटला चालू आहे, तो तुला शिक्षा देऊन तुरुंगात टाकण्याकरता नव्हे. त्यात माझा हेतू काही वेगळाच आहे. माझा हेतू साधण्याकरता खटला केवळ निमित्त आहे.’’

पुढे सेशन्स कोर्टात खटला सुरु झाला तेव्हा मी पुराव्यात माझ्या विरुद्ध काय खोटे आहे आणि कुठल्या मुद्यांवर साक्षीदारांची उलट तपासणी घ्यावी इत्यादि गोष्टींविषयी माझ्या वकिलास लागणारी माहिती लिहून ठेवू लागलो. तेवढ्यात एक अनपेक्षित गोष्ट घडली. माझ्या बचावाकरता जी व्यवस्था केली होती तीत अचानक बदल करण्यात आला, व दुसराच वकील माझा बचाव करण्यास उभा राहिला. तो म्हणजे माझा मित्र चित्तरंजन दास. तो माझा वकील म्हणून येणार होता, हे मला कधीच कळले नव्हते. मला वाचविण्यासाठी त्याने इतर सर्व विचार बाजूला सारले, वकिली पूर्णपणे सोडली, अर्ध रात्रीपर्यंत जागून आपली प्रकृती देखील खराब करून घेतली. तो माझा वकील म्हणून काम चालविणार हे कळून मला फार बरे वाटले. तरीसुद्धा त्याच्या उपयोगाकरता माहिती लिहून ठेवणे अवश्य आहे, असेच मला वाटत होते. परंतु लवकरच ते सर्व माझ्यापासून बाजूला सारण्यात आले. आणि मला आतून संदेश आला की, ‘‘हाच मनुष्य तुला तुझ्याभोवती पसरलेल्या जाळ्यातून सोडवील. ते सर्व कागदपत्र बाजूला सार. त्याला माहिती पुरविण्याचे नादी तू लागू नकोस. मी त्याला सूचना देईन.’’

तेव्हापासून खटल्यासंबंधी एक शब्दही मी माझ्या वकिलाशी बोललो नाही किंवा त्याला कसलीही माहिती पुरविली नाही; आणि यदाकदाचित एखादा प्रश्न मला विचारलाच तर, मला नेहमी असे आढळून येई की, माझे उत्तर खटल्याच्या दृष्टीने निरुपयोगी असेच असे. सर्व काही मी वकिलावर सोपवून दिले आणि त्याने खटला पूर्णपणे आपल्या हातात घेतला. आणि त्यात यश संपादिले हे तुम्हा सर्वांस ठाऊकच आहे. खटला चालू असतानाच त्याचा निकाल कसा होणार, त्या बाबतीत ईश्वरेच्छा काय आहे, हे मला कळून चुकले होते. कारण नेहमी मला  ईश्वर आतून सांगत असे की, ‘‘ह्या सर्व गोष्टीचा कर्ता-करविता मी आहे, म्हणून तुला भिण्याचे कारण नाही. ज्या कामासाठी मी तुला तुरुंगात आणून ठेवले आहे त्या कामाकडे वळ. जेव्हा तू तुरुंगातून बाहेर पडशील तेव्हा ध्यानात ठेव की, कधी कचरायचे नाही, की कशाला भ्यायचे नाही. नेहमी ध्यानात ठेव की, ह्या सर्व गोष्टी माझ्या तंत्राप्रमाणे चालल्या आहेत, तुझ्या किंवा इतर लोकांच्या नव्हेत. म्हणून कार्यामध्ये कितीही विघ्ने आणि हालअपेष्टा आल्या, अगर मानवी दृष्टीने अशक्य अशी परिस्थिती निर्माण झाली तरी, मला अशक्य अगर कठीण काहीच नाही. राष्ट्रामध्ये जे चैतन्य दिसत आहे ते माझे आहे. वासुदेव तो मीच, नारायण तो मीच. आणि मी जे इच्छिन तेच होईल, दुसरे इच्छितील ते नाही. ज्या गोष्टी मी घडवून आणण्याचे ठरविले आहे त्या कोणत्याही मानवी शक्ती थांबवू शकणार नाही.’’

इतक्या अवधीत, माझी एकांतवासाची मुदत संपून मला इतर आरोपींबरोबर ठेवण्यात आले. तुम्ही आज माझ्या स्वार्थत्यागाची आणि राष्ट्रभक्तीची बरीच तारीफ केली आहे. तसले उद्गार तुरुंगातून बाहेर आल्यापासून मी ऐकत आलो आहे. परंतु ते ऐकताना मला आता पेच पडतो, दु:खही होते. कारण मी स्वत:ची दुर्बलता ओळखून आहे. माझ्यातील दोष जाणून आहे. ते पूर्वी मला माहीत नव्हते अशातला भाग नाही. पण एकांतवासात ते सर्व माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले आणि त्यांनी मला हैराण करून सोडले. मला कळून आले की, मनुष्य म्हणून मी एक दुर्बल व्यक्ती असून, माझ्यात अनेक दोष आहेत आणि दैवी शक्ती जर माझ्यात आली तरच, मी बलवान होऊन, माझ्या हातून काही कामगिरी होईल.

जेव्हा मला ह्या तरुण मंडळीमध्ये आणले तेव्हा मला आढळून आले की, पुष्कळांच्या ठिकाणी इतके महान धैर्य आणि कडक वैराग्य आहे की, त्यांचे मानाने मी काहीच नाही. त्यापैकी एक दोघे जण मला असेही भेटले की, ते केवळ सामर्थ्य आणि वैशिष्ट्य (ते पुष्कळांत होते) ह्यांतच श्रेष्ठ नव्हते, तर ज्या बौद्धिक योग्यतेचा मला अभिमान होता त्यातही ते श्रेष्ठ होते. ईश्वर मला म्हणाला, ‘‘माझ्या आज्ञेने ही तरुण पिढी, हे नवीन सामर्थ्यशाली राष्ट्र उदयास येत आहे. ह्या तरुणांची योग्यता तुझ्या पेक्षाही अधिक आहे. मग तुला इतकी भीती का वाटावी ? तू बाजूला झालास किंवा आळसलास तरी  हे कार्य चालूच राहील. उद्या तुला बाजूला सारले तरी हीच तरुण मंडळी पुढे येऊन, तुझे कार्य उचलून घेतील आणि तुझ्याहून जास्त नेटाने आणि जोराने करतील. ह्या राष्ट्राच्या उद्धाराला उपयोगी पडेल असा एक संदेश सांगण्यापुरती मी तुझ्या अंगी माझी शक्ती घातली आहे एवढेच.’’

नंतर काही घटना घडल्यामुळे मला एकाएकी एकांतवासाच्या कोठडीत ठेवण्यात आले. त्या एकांतवासाच्या कालावधीत मला काय काय अनुभव आले ते सांगण्याची मला मनाई आहे. पण इतकेच सांगतो की, ईश्वराने दररोज मला त्याची आश्चर्ये दाखवून, हिंदुधर्माची सत्यता पूर्णपणे पटवून दिली. त्या पूर्वी माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या.

लहानपणी माझे सर्व शिक्षण इंग्लंडमध्येच झाले. तेथील राहणी, आचारविचार सर्व काही जाणूनबुजून परकीय. अशा परकीय कल्पनात आणि अगदी परकीय वातावरणात वाढल्यामुळे, एके वेळी मला वाटे की, हिंदुधर्मात सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी काल्पनिक असाव्यात, त्यात मनोराज्य खूपच असले पाहिजे व काही गोष्टी तर निव्वळ भ्रामक, केवळ मायाजाल अशाच असल्या पाहिजेत. पण दररोज मन, अंत:करण, शरीर ह्यांच्या द्वारे मला हिंदुधर्मातील तत्त्वांची सत्यता पटत गेली. त्या सर्व गोष्टींचा मला प्रत्यक्ष अनुभव येऊ लागला, आणि ज्या शंकांचे भौतिक शास्त्रांना निरसन करता येईना त्या मला अगदी स्पष्टपणे कळू लागल्या.

जेव्हा मी पहिल्याने ईश्वराचे ध्यान करू लागलो तेव्हा माझ्या ठिकाणी संपूर्णत: भक्ताचा भाव नव्हता किंवा ज्ञान्याचा भावही नव्हता. खूप दिवसांपूर्वी बडोद्यात असतानाच, मी ह्या मार्गात शिरलो आहे. त्या वेळी स्वदेशी चळवळ सुरु झाली नव्हती किंवा मी सार्वजनिक कामातही पडलो नव्हतो. त्यावेळी ईश्वरावर माझा विश्वास नव्हता असे म्हटले तरी चालेल. त्यावेळी मी निरीश्वरवादी, नास्तिक, शंकेखोर असा होतो. देव आहे किंवा नाही ह्याविषयी मला जबरदस्त शंका होती. ईश्वराच्या अस्तित्वाचा मला अनुभव आलेला नव्हता. तरी पण वेद, गीता, हिंदुधर्म ह्यातील सिद्धान्तांकडे मी ओढला गेलो होतो.

मला वाटले की, योगमार्गाने गेले असता वेदांताच्या पायावर रचलेल्या ह्या धर्माप्रमाणे वागत गेल्यास सत्याचा शोध खास लागेल. म्हणून योगाचा अवलंब करून, योगाभ्यासाने माझी कल्पना बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्याचा मी निश्चय केला. तेव्हा मी ईश्वराची प्रार्थना अशा भावनेने करीत असे, ‘‘हे ईश्वरा, जर तू खरोखरीचा कोणी असशील तर तू माझे अंत:करण ओळखीत असला पाहिजेस. तुला माहीत आहेच मी मुक्ती मागत नाही, इतर लोक ज्या गोष्टी मागतात त्या मी मागत नाही. ह्या राष्ट्राचा उद्धार करण्याकरता पुरेशी शक्ती तू मला द्यावी, एवढीच माझी मागणी आहे. ज्या लोकांवर माझे प्रेम आहे त्यांच्यासाठीच जगावे, कार्य करावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी प्रार्थना करतो की, त्यांच्या सेवेतच माझे सर्व आयुष्य जावे.’’

योगाभ्यासाने सिद्धी मिळविण्याकरता मी दीर्घकाळपर्यंत खूप प्रयत्न केला. त्यात मला काही प्रमाणात यशही आले, परंतु जे कळावे म्हणून माझी उत्कट इच्छा होती, त्याबाबतीत माझे समाधान होईना. पुढे तुरुंगात पडल्यावर एकांतवासाच्या कोठडीत मी पुन्हा त्या साठी जोराने प्रयत्न करू लागलो. मी देवाजवळ मागणे धरले की, ‘‘ईश्वरा, तू मला आपला आदेश दे. काय कार्य करावे व कसे करावे हे मला कळत नाही. म्हणून मी कसे वागावे हे तूच मला सांग.’’

योगाभ्यास चालू असतानाच योगयुक्त स्थितीत मला दोन आदेश मिळाले. पहिला आदेश असा, ‘‘ह्या राष्ट्राचा उद्धार करण्यास मदत करावी, हे काम मी तुला सांगत आहे. तुझी तुरुंगातून बाहेर पडण्याची वेळ लवकरच येईल. कारण ह्यावेळी तू दोषी ठरावे किंवा इतर देशभक्तांप्रमाणे हाल सोसण्यात तुझे आयुष्य खर्च व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी तुला काम करण्यास सांगत आहे. तू मला आदेश मागत होतास तो हा घे आदेश. तुरुंगाबाहेर पडल्यावर राष्ट्रोद्धाराचे कामी मदत कर.’’

दुसरा आदेश असा होता, ‘‘हिंदुधर्माविषयी तुझ्या मनात कित्येक शंका होत्या. त्या शंकांचे मी निरसन केले आहे; आणि आता तुला हिंदुधर्माची सत्यता पटली आहे. ऋषी-मुनी, साधु-संत, अवतारी पुरुष, ह्यांच्याद्वारे हा धर्म मी पूर्णत्वास आणला आहे. त्याचा विकास केला आहे; आणि आता तो सर्व जगास शिकविण्याची वेळ आली आहे. त्याप्रमाणे सर्व राष्ट्रांमधून माझे कार्य करण्यास, तो धर्म ह्या देशाची मर्यादा सोडून बाहेर पडत आहे. माझा संदेश ह्या हिंदुराष्ट्राद्वारे सर्व जगात पोहोचविण्यासाठी मी ह्या हिंदुराष्ट्राचा उद्धार करीत आहे. जो सनातन धर्म आजपर्यंत तुला बरोबर समजला नव्हता, तो मी तुला स्पष्ट करून दाखविला आहे. तुझ्यातील अज्ञेयवाद्याला आणि संदेहवाद्याला उत्तरे मिळून तुझ्या सर्व शंकांचे निरसन झालेले आहे. भौतिक आणि आध्यात्मिक, आंतरबाह्य सर्व प्रकारचे दाखले देऊन, अनुभव देऊन मी तुझे पूर्ण समाधान केले आहे, व ते सर्व तुला पटले आहे. तर आता जेव्हा तू बाहेर पडशील, तेव्हा सर्व देशाला नेहमी माझा हाच संदेश सांग की, सनातन धर्माकरता तुमचा उदय होत आहे. स्वत:च्या सुखाकरता, बडेजावाकरता तुमचा उदय होत नसून, केवळ जगाच्या कल्याणाकरता, जगाचा नाश होऊ नये म्हणून हिंदुस्थानचा उदय होत आहे. मानवजातीच्या उपयोगी पडता यावे म्हणूनच मी तुम्हाला स्वातंत्र्य देत आहे. म्हणून हिंदुस्थानचा उदय म्हणजेच सनातन धर्माचा उदय. हिंदुस्थान वैभवास चढणार म्हणजे सनातन धर्मच वैभवास चढणार. हिंदुस्थान मोठा होऊन हिंदी साम्राज्य जगभर पसरणार ह्याचा अर्थ हाच की, सनातन धर्माचा प्रसार होत होत, सर्वत्र धर्माचेच साम्राज्य स्थापित होणार. धर्माकरताच हिंदुस्थानचा उदय व धर्माने चालेल तोपर्यंतच हिंदुस्थानचे अस्तित्व टिकणार. हिंदुस्थानच्या बाबतीत धर्मविस्तार म्हणजेच देशविस्तार होय. सर्व ठिकाणी मी आहे, मनुष्यमात्रांमध्ये मीच वास करीत आहे, सर्व वस्तूमात्रांत मीच आहे, हे मी तुला दाखविलेच आहे. ही राष्ट्रीय चळवळ देखील माझेच स्वरूप आहे. जे लोक राष्ट्राच्या उद्धाराकरता झटत आहेत, त्यांच्यातच मी कार्य करतो असे नाही, तर त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या मार्गात आड येणाऱ्यांमध्येही मी कार्य करीत आहे. प्रत्येक माणसात मीच कार्य करीत असल्यामुळे कोणी कोणतेही काम कुठल्याही समजुतीखाली करीत असला, तरी त्या कामाची माझ्या इच्छित कार्यात मदतच होणार आहे. उलट दिशेने काम करणारे लोक देखील माझे शत्रू नसून हस्तकच आहेत. तुम्ही जी जी कामे करता त्यांचा तुमच्या न कळत, माझ्या कार्यासाठीच उपयोग होत आहे. तुमच्या मनातून एखादी गोष्ट करावयाची असली तरी, हातून घडते भलतीच. अमुक एका दृष्टीने तुम्ही काही गोष्टी करता पण त्याचा परिणाम वेगळा किंवा विरुद्धच होतो. शक्तिदेवी सर्व लोकांच्या हृदयात शिरून कार्य करीत आहे. ह्या राष्ट्राला जागृत करून त्याचा उद्धार करण्याची तयारी मी कित्येक दिवस करीत आहे, पण खरी उद्धाराची वेळ आता आली आहे व हे कार्य पूर्णपणे मीच पार पाडणार आहे.’’

मला जे काही तुम्हाला सांगावयाचे आहे ते हेच आहे. तुमच्या संस्थेचे नाव ‘धर्म संरक्षक संस्था’ असे आहे. धर्मसंरक्षण, जगाच्या कल्याणासाठी हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन, हेच आपणा सर्वांपुढे श्रेष्ठकार्य आहे. पण हिंदुधर्म, ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, तो धर्म तरी काय आहे ? त्या धर्माचे आचरण हिंदुलोक करतात, समुद्र आणि हिमालय ह्यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या ह्या द्वीपकल्पातच त्याचा उदय झाला व शेकडो वर्षेपर्यंत ह्या प्राचीन आणि पुण्यभूमीतच आर्यांच्या हवाली तो करण्यात आला. म्हणूनच त्याला हिंदुधर्म असे नाव पडले. जगाच्या एका मर्यादित भागापुरती किंवा एखाद्या देशापुरतीच त्या धर्माची व्याप्ती नाही. अमुक एका देशाचा हा धर्म, त्याचीच तो जणू मालमत्ता अशातला मुळीच प्रकार नाही.

ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर सनातन धर्मच होय. इतर सर्व धर्मांचा त्यांत समावेश होत असून, तो खरा सार्वत्रिक अथवा सार्वजनिक धर्म आहे. जर एखादा धर्म सार्वजनिक स्वरूपाचा नसेल, देशकाल ह्यांनी मर्यादित असेल, तर त्याला सनातन धर्म म्हणताच यावयाचे नाही. जो धर्म संकुचित आहे, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा आहे, जो मर्यादित स्वरूपाचा आहे, असा धर्म मर्यादित कालापर्यंतच टिकेल; व ठरावीक हेतू अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहील.

हा असा एकच धर्म आहे, जो भौतिक वादावर विजयी होऊ शकतो, कारण त्याने भौतिक शास्त्रांचे शोध आणि तत्त्वज्ञानाची चिंतने ह्यांचा आधीच पूर्णपणे विचार करून, त्यांना समर्पक उत्तरेही देऊन ठेवली आहेत. हा असा एकच धर्म आहे जो ईश्वर आपणा सर्वांच्या अगदी जवळ आहे, असे मानवजातीच्या मनावर ठसवितो आणि मनुष्यमात्राला ईश्वराचा साक्षात्कार होण्याचे मार्ग अनंत आहेत असे म्हणतो. इतर सर्व धर्म नुसते सांगतात की, ‘ईश्वर हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ईश्वरातच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ईश्वराशिवाय आपणास अस्तित्व नाही;’

पण हा असा एकच धर्म आहे, जो ह्या सर्व सिद्धांतांची, ह्या तत्त्वांची पावलोपावली, क्षणोक्षणी, अंमलबजावणी करण्यास सांगतो व तशी अंमलबजावणी करवून घेतो.

हा असा एकच धर्म आहे, जो मनुष्यजातीला ही तत्त्वे समजावून देऊन, श्रद्धेने त्यावर विश्वास ठेवण्यास तयार करतो; इतकेच नव्हे तर ह्या सिद्धांतांचा, ह्या तत्त्वांचा पूर्णपणे अनुभवही आणून देतो.

हा असा एकच धर्म आहे, जो हे जग, संसार म्हणजे केवळ ईश्वरी लीला आहे हे दाखवून देतो, व ह्या लीलेची अतिसूक्ष्मतत्त्वे व नियम समजावून देऊन, प्रत्येकाने त्यात कसे वागावे हे सर्व शिकवतो.

हा असा एकच धर्म आहे, जो अति क्षुल्लक गोष्टीत देखील व्यवहाराची व धर्माची यत्किंचितही फारकत होऊ न देता, मनुष्यमात्राला अमरत्वाचा अनुभव आणून देऊन, मृत्यूचे भय म्हणजे केवळ भ्रम आहे, असे मनावर ठसवितो.

आज माझ्या तोंडून वदवायचा होता तो ईश्वराचा संदेश हा एवढाच. मला जे काही बोलावयाचे होते ते माझ्या डोक्यातून पार काढून टाकण्यात आले, आणि त्याऐवजी जे तेथे ठेवण्यात आले ते हे इतकेच. ह्याहून जास्त मला काही सांगताच येत नाही. सांगायचा तो संदेश सांगून झाला.

अशाच योगयुक्त स्थितीत पूर्वी एकदा मी सांगितले होते की, सध्याची ही चळवळ खरी राजकीय चळवळ नव्हे व राष्ट्रभक्ती म्हणजे राजकारण नव्हे, तर तो एक श्रेष्ठ प्रतीचा धर्म आहे, ती एक निष्ठा आहे, सतत चालण्याचा तो एक शाश्वत मार्ग आहे. आज पुन्हा मी तेच सांगतो परंतु जरा वेगळ्या रीतीने. पूर्वीप्रमाणे राष्ट्रभक्ती हा एक धर्म, मार्ग किंवा निष्ठा आहे असे न म्हणता ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो तोच आपला राष्ट्रधर्म आहे असे मी म्हणतो. सनातन धर्म हा हिंदुराष्ट्राला जन्मजात मिळालेला आहे. ह्या धर्माच्या वाढीबरोबर राष्ट्रही वैभवास चढते. धर्म आणि राष्ट्र यांची कायमची सांगड घालून दिली आहे. जेव्हा सनातन धर्माचा ऱ्हास होऊ लागतो तेव्हा त्याबरोबर राष्ट्राचाही ऱ्हास होऊ लागतो. आणि जर सनातन धर्म नष्ट होणे शक्य असेल तर, सनातन धर्माबरोबर राष्ट्राचाही नाश होईल. ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे’, हाच संदेश मला तुम्हाला कळवावयाचा होता.

**