श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याशी संबंधित कार्य ज्या तीन संस्थांच्या माध्यमातून चालू असते त्या संस्था म्हणजे

श्रीअरविंद आश्रम, श्रीअरविंद सोसायटी आणि  ऑरोविल.

त्या प्रत्येकाच्या स्वतंत्र websites आहेत, त्यांच्या लिंक्स येथे दिल्या आहेत.

श्रीअरविंद आश्रम
श्रीअरविंद आश्रम

श्रीअरविंद आश्रम : श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाखाली इ.स.१९२६ साली श्रीअरविंद आश्रम स्थापन करण्यात आला. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, पाँडिचेरी येथे हा आश्रम आहे. आज तेथे सुमारे २००० साधक राहतात. या साधकांचे सर्व जीवन व्यवहार आश्रमाच्या केंद्रस्थानी असलेल्या समाधीभोवती चालू असतात. आश्रमाच्या मुख्य इमारतीमध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे वास्तव्य असे.  येथील सामुदायिक जीवनात साधकांच्या साधनेबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा ह्याचीही काळजी घेतली जाते. आश्रमाच्या विविध खात्यांमध्ये चालणाऱ्या व्यवहारातून आश्रम स्वयंपूर्ण रीतीने चालविला जातो.

श्रीअरविंद सोसायटीचे बोधचिन्ह
श्रीअरविंद सोसायटी

श्रीअरविंद सोसायटी : श्रीअरविंद व श्रीमाताजी यांची ध्येयधोरणे, पूर्णयोगाची त्यांची पद्धत सदस्यांना व एकंदरच सर्वांना ज्ञात व्हावीत, व ती उद्दिष्टे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करावेत आणि श्रीअरविंद यांनी पाहिलेले आध्यात्मिक समाजाचे स्वप्न साकार करावे या भूमिकेतून श्रीमाताजींनी १९६० साली ‘श्रीअरविंद सोसायटी’ची स्थापना केली. ‘श्रीअरविंद सोसायटी’ वैयक्तिक पूर्णत्व, सामाजिक रूपांतरण, आणि विविधतेमध्ये एकता यासाठी कार्यरत आहे. उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांना ज्यांना कार्य करण्याची इच्छा आहे त्या सर्वांना सोसायटी आवाहन करीत आहे.

ऑरोविल

ऑरोविल : ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.