प्रतीक आणि त्याचा अर्थ
ध्यानावास्थेमध्ये किंवा स्वप्नामध्ये ज्या गोष्टी दृष्टीस पडतात त्यांचे आध्यात्मिक अर्थ काय ?
हे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी वेळोवेळी सांगितले आहेत, त्याचेच हे संकलन !!

मंदिर
- मंदिर हे आध्यात्मिक अभीप्सेचे प्रतीक आहे. गुंतागुंतीची रचना असलेले मंदिर असेल तर त्याद्वारे समृद्ध आणि बहुआयामी अशी अभीप्सा दर्शविली जाते. (CWSA 30 : 181)

लाल कमळ
- लाल कमळ म्हणजे या पृथ्वीतलावर ईश्वराचे अस्तित्व. (CWSA 30 : 179)
- लाल कमळ हे ‘अवतारा’ चे प्रतीक आहे आणि लाल कमळ वाहणे या कृतीमधून अवताराच्या चरणी पूर्ण आत्मनिवेदन दर्शविले जाते. (CWM 15:39)

शंख
- शंख हा नेहमी अभीप्सेचे किंवा आलेल्या आध्यात्मिक हाकेचे प्रतीक असतो. कधीकधी तो साक्षात्कारासाठी आलेल्या हाकेचेही प्रतीक असतो. शंख हा विजयाच्या घोषणेचे प्रतीक असतो. (CWSA 30 : 185)

सर्प
- सर्पाद्वारे नेहमीच एक प्रकारच्या ऊर्जेचा निर्देश होतो – बऱ्याचदा वाईट ऊर्जेचाच; पण सर्पाद्वारे कोणत्यातरी तेजोमय वा दिव्य ऊर्जेचासुद्धा निर्देश होऊ शकतो. (CWSA 30 : 170)
- सर्प हे ऊर्जेचे प्रतीक असते – विशेषत: कुंडलिनी शक्तीचे; ही दिव्य शक्ती सर्वात खालच्या शारीरिक चक्रामध्ये, मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून बसलेली असते. आणि जेव्हा ती जागी होते तेव्हा ती मज्जारज्जूतून वर वर जात वरील उच्चतर चेतनेला भेटते. (CWSA 30 : 171-172)

स्फिंक्स
- केवळ गुह्य ज्ञानानेच ज्याचे उत्तर उलगडू शकते अशा चिरंतन शोधाचे ‘स्फिंक्स’ हे प्रतीक आहे. (CWSA 30 : 182)

अग्नी
- शुभ्र अग्नी हा अभीप्सेच्या अग्नीचे, तर लाल अग्नी हा त्याग आणि तपस्येच्या अग्नीचे प्रतीक आहे, निळा अग्नी हा अज्ञान दूर करणाऱ्या आणि शुद्धीकरण करणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानाचे आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे.
- अग्नी हा नेहमीच शुद्धीकरणाचा अग्नी असतो – तो जेव्हा प्राणावर कार्य करत असतो तेव्हा तो लाल भडक असतो; प्राणामुळे चैत्य अस्तित्व झाकोळले गेले नसेल तर चैत्य अस्तित्वाचा गुलाबी रंग हा अधिकाधिक खुलून वर येतो. (CWSA 30 : 147)

सोपान
- प्रश्न : मला एक असे स्वप्न दिसले. माझ्यासमोर मला एक पांढरा शुभ्र असा जिना दिसत होता. त्या जिन्याला अगणित पायऱ्या होत्या, आणि त्या वर वर आकाशात जात जात, सर्वात वरच्या बाजूला लुप्त होऊन गेल्या होत्या. युरोपियन पद्धतीचा पांढरा शुभ्र झगा परिधान केलेली एक शुभ्र व्यक्ती जिन्याच्या वरच्या भागातून त्वरेने खाली उतरली आणि एका ठिकाणी उभी राहून तिने तिचे बाहू माझ्या दिशेने पसरले. ही माता कोण असेल ?
- श्रीअरविंद : त्या श्रीमाताजी आहेत. जिन्याचे हे प्रतीक बऱ्याच जणांना दिसते आणि त्याचा अर्थ ‘आरोहणासाठी आलेली हाक आणि तिचा स्वीकार’ असा होतो. (CWSA 32:281-282)

कर्मशाळा
- (एका व्यक्तीला स्वप्नामध्ये दिसलेल्या (workshop) कर्मशाळे’चा अर्थ येथे श्रीअरविंदांनी उलगडून दाखविला आहे.) सर्वसाधारण स्वरूपाच्या ज्या रचना आणि कृती असतात, त्यांनी गजबजलेल्या अशा सर्वसामान्य प्रकृतीचे ‘कर्मशाळा’ हे प्रतीक असू शकते. त्यांच्यामधून पलीकडे आंतरिक किंवा अंतरतम अस्तित्वाप्रत जाणे हे बिकट असते. रिकाम्या जागा असणाऱ्या भिंती ह्या बाह्य मन जेथे शिरकाव करू शकत नाही अशा अस्तित्वाच्या विभिन्न भागांचे, कदाचित आंतरिक प्राणमय, भावनात्मक भागांचे प्रतीक आहे; त्याचे छत हे बुद्धीचे वा विचारी मनाचे प्रतीक आहे की जे, व्यक्तीला भिंतीमध्ये डांबून ठेवते आणि उच्चतर जाणिवेच्या खुल्या अवकाशात जाण्यापासून रोखते. पण या साऱ्यामधूनदेखील शांती, प्रकाश आणि आनंद यांनी युक्त अशा उच्चतर जाणिवेप्रत पोहोचण्याचा एक खुला मार्ग जात असतो. (CWSA 12 : 152)

उमललेली फुलं
- उमललेली फुलं उमललेली फुलं ही बहुधा नेहमीच चैत्य गुणांची वा गतिविधींची कधी शक्यता, कधी खात्री, तर कधी त्या विकासाची खरीखुरी अवस्था दर्शवीत असतात. जेव्हा चैत्य पुरुष सक्रिय असतो तेव्हा मुबलक प्रमाणात फुले दिसतात.
- जाणिवेच्या काही भागांचे उन्मीलन हे फुलांनी दर्शविले जाते. (CWSA 30 : 178)

बासरीवादन करणारा श्रीकृष्ण
- बासरीवादन करणारा श्रीकृष्ण या जगत्लीलेमध्ये अवतरलेला आहे. कनिष्ठ पातळी वरील अज्ञानी, मर्त्य जीवनाच्या लीलेमध्ये परिवर्तन करण्यासाठी, त्यामध्ये ईश्वराचा दिव्यानंद उतरविण्यासाठी आणि त्या अज्ञानी लीलेच्या जागी त्याच्या दिव्य आनंदाची लीला प्रस्थापित करण्याचा प्रयास करणाऱ्या हाकेच्या सुरांचे प्रतीक म्हणजे ती बासरी आहे.
- येथे श्रीकृष्णाची प्रतिमा ही दिव्य प्रेम व आनंदाचे प्रतीक आहे आणि त्याची बासरी ही शारीरिक अस्तित्वाला, त्याच्या भौतिक जगाच्या आसक्तीतून बाहेर पडून जागृत व्हावयाची आणि प्रेम व आनंद ह्यांच्याकडे वळण्याची हाक देत आहे. राधेसहित कृष्ण हा दिव्य प्रेमाचे प्रतीक आहे. बासरी हे दिव्य प्रेमाच्या हाकेचे प्रतीक आहे. (CWSA 30 : 156-157)

कोळी
- ब्रह्म स्वत:मधून विश्वाची निर्मिती करते, आणि त्यातच ते राहते आणि पुन्हा स्वत:मध्येच त्याचा विलय करते व हे दर्शविण्यासाठी, उपनिषदामध्ये कोळ्याची प्रतिमा वापरली जाते. प्रतीकांमधील आशय हा एखाद्याला त्याचा अर्थ काय भावतो ह्यावर अवलंबून असतो. एखाद्यासाठी कोळी हे यश किवा यशस्वी रचनांचे प्रतीकही असू शकते. (CWSA 30 : 176)

तारा
- ताऱ्याने निर्मिती, रचना किंवा निर्मितीची वा रचनेची शक्ती किंवा तिची निश्चितता दर्शविली जाते. तारा हा नेहमीच येणाऱ्या प्रकाशाची निश्चितता दर्शवितो. तारा हा चेतनेमधील उच्चतर अनुभवाचा निदर्शक असतो. (CWSA 30 : 146)

नवजात बाळ
- बाळाच्या माध्यमातून सहसा चैत्य पुरुष दर्शविला जातो. स्वप्नात बालक, विशेषत: नवजात बाळ दिसणे हे बाह्य प्रकृतीमध्ये चैत्यपुरुषाचा किंवा आत्म्याचा उदय झाल्याचे द्योतक आहे. (CWSA 30 : 161)

हत्ती
- हत्ती हे सामर्थ्याचे प्रतीक आहे. हत्तीने कधीकधी बुद्धिमत्तेने प्रकाशित झालेले सामर्थ्य दर्शविले जाते, तर कधी अडथळे दूर करणारे सामर्थ्य हत्ती या प्रतीकाने दर्शविले जाते. (CWSA 30 : 167)

पुस्तक
- पुस्तकाने एक प्रकारचे ज्ञान दर्शविले जाते. (CWSA 30 : 186)

हरिण
- अमर्त्यतेचे प्रतीक. आध्यात्मिक प्रगतीमधील गतिमानतेचे प्रतीक. (CWSA 30 : 168)
- मृदुता, सौम्यता आणि हालचालीतील गतिमानतेचे, चपळतेचे प्रतीक. (CWM 15 : 37)

हिरा
- हे श्रीमाताजींच्या चेतनेचे प्रतीक आहे. एखाद्या क्षणी त्या त्यांच्या चेतनेची कोणती विशिष्ट शक्ती पुढे करतात त्यावर त्या हिऱ्याचा रंग अवलंबून असतो. हिरा हे श्रीमाताजींचा प्रकाश आणि ऊर्जा ह्यांचे प्रतीक आहे. (व्यक्तीमध्ये) श्रीमाताजींची चेतना जेव्हा सर्वात जास्त उत्कट असते तेव्हा तेथे हिऱ्याचा प्रकाश असतो. (CWM 32 : 267)

वृक्षवल्ली
- प्रेमाची स्पंदने ही फक्त मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसतात; मनुष्यप्राण्याच्या तुलनेत इतर जगतांमध्ये ती स्पंदने कमी दूषित झालेली आढळतात. झाडांकडे व फुलांकडे पाहा. जेव्हा सूर्य मावळतो आणि सारे काही शांत होते तेव्हा थोडा वेळ शांत बसून निसर्गाशी एकत्व पावण्याचा प्रयत्न करा. ह्या पृथ्वीपासून, झाडांच्या अगदी मुळापासून, त्याच्या तंतूतंतूंमधून वरवर जाणारी, अगदी सर्वाधिक उंच अशा बाहू फैलावलेल्या शाखांपर्यंत पोहोचलेल्या उत्कट प्रेमाची, उत्कट इच्छेची अभीप्सा तुम्हाला संवेदित होईल. प्रकाश आणि आनंद घेऊन येणाऱ्या अशा कशाची तरी ती आस असते, कारण तेव्हा प्रकाश मावळलेला असतो आणि त्यांना तो पुन्हा हवा असतो. ही आस, ही उत्कंठा एवढी शुद्ध आणि तीव्र असते की, झाडांमधील ही स्पंदने जर तुम्हाला जाणवू शकली तर तुमच्यामध्ये देखील, येथे आजवर अभिव्यक्त न झालेल्या शांती, प्रकाश, प्रेम यांविषयीची उत्कट प्रार्थना उदयाला येत आहे आणि वर वर जात आहे हे तुम्हाला जाणवेल. (CWM 03 : 72)
- प्रश्न : फुलं ज्या चैत्य प्रार्थनेचे (Psychic Prayer) प्रतिनिधित्व करतात त्या प्रार्थनेचे स्वरूप कसे असते?
- श्रीमाताजी : चैत्य पुरुष जेव्हा झाडाझुडपांच्याद्वारे, फुलांच्या रूपाने अभिव्यक्त होतो तेव्हा तो नि:शब्द प्रार्थनेचे रूप धारण करतो. ते जणू झाडांनी दिव्यत्वाच्या दिशेने केलेले ऐलान असते. (Flowers and their Messages : VIII)

भारतीय संघराज्याचा आध्यात्मिक ध्वज
- ज्याला श्रीअरविंदांनी ‘भारतीय संघराज्याचा आध्यात्मिक ध्वज’ असे म्हटले होते, त्याचे ध्वजारोहण ‘श्रीअरविंद आश्रमा’मध्ये खास प्रसंगीच केले जाते. श्रीमाताजींचे सुवर्ण रंगाचे बोधचिन्ह असणारा निळ्या रंगाचा ध्वज ह्यालाच श्रीअरविंदांनी उपरोक्त नामाभिधान देऊ केले होते. ‘त्याचा चौरस आकार, त्याचा रंग आणि त्यावरील प्रत्येक तपशील यांना खास प्रतीकात्मक अर्थ आहे,’ असे श्रीमाताजींनी सांगितले आहे. घडण चालू आहे, ह्याचा संकेत चौरस आकाराने मिळतो. ध्वजाच्या निळा रंग हा श्रीकृष्णाचा रंग आहे आणि त्याने आध्यात्मिक किंवा ईश्वरी चेतनेचा संकेत मिळतो. ती ईश्वरी चेतना खाली जडभौतिकामध्ये अवतरित करणे आणि त्या चेतनेला जगतजीवनाचे नेतृत्व करू देणे हे आपले कार्य आहे ते या ध्वजाने दर्शविले जाते. भविष्यात भारत जेव्हा जेव्हा स्वत:चे भूभाग पुनर्प्राप्त करेल तेव्हा तेव्हा ह्या ध्वजाचे ध्वजारोहण केले जाईल असे श्रीमाताजींनी सांगितले होते. (CWSA 32 : 598)

आईच्या कवेतील अर्भक
- आईच्या कवेतील अर्भक हे चैत्य पुरुषाचे प्रतीक आहे. चैत्य पुरुष हा नेहमीच बालकाच्या रूपात दिसतो असे नाही. तो कधीकधी प्रतिकात्मक पद्धतीने नवजात अर्भकाच्या रूपात दिसतो. बऱ्याच जणांना तो वेगवेगळ्या वयातील बालकांच्या रूपात दिसतो. हा अगदी सामायिक आणि नेहमीचा अनुभव आहे; तो कोणत्या भावनिक प्रकृतीशी खासकरून निगडित नाही. जाणिवेचा सत् चैत्य-प्रकृतीमध्ये नवजन्म, किंवा बालकाचा मातेवरील विश्वास, अवलंबित्व, विसंबून असणं या गोष्टीही त्यातून दर्शविल्या जातात. (CWSA 30 : 160)

कबूतर किंवा पारवा
- कबूतर हे शांतीचे प्रतीक आहे. त्यांचे जे विविध रंग आहेत ते प्राण दर्शवितात. हिरवा रंग हे प्राणामधील आत्मदानाचे प्रतीक आहे, तर निळा रंग हे प्राणातील उच्च चेतनेचे प्रतीक आहे. तेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे, त्यातून असे व्यक्त होते की, उच्चस्तरावरून शांतीचा प्रभाव प्राणावर पडत आहे. (CWM 30 : 176)