अभीप्सा २०२० अंकामधील आशय

श्रीमाताजींचे प्रतीक

जानेवारी २०२० –   श्रीमाताजींच्या प्रतीकामध्ये मध्यवर्ती भागात चार आणि बाहेरील बाजूस बारा पाकळ्या आहेत. या बारा पाकळ्या बारा गुणांचे प्रतीक आहेत. त्यातील प्रतीकात्मकता व त्या गुणांचे योगमार्गातील महत्त्व या अंकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२० – शक्ति-सोपान म्हणजे श्रीमाताजींच्या जीवनातील चार महत्त्वाच्या पायऱ्या. जडणघडण फ्रान्समध्ये, प्रशिक्षण अल्जेरियामध्ये, प्रयोग जपानमध्ये आणि अतिमानसाच्या दिशेने वाटचाल पाँडिचेरी येथे, अशा ह्या चार पायऱ्या आहेत. श्रीमाताजींच्या या वाटचालीवर, मुख्यत्वे त्यांच्या पाँडिचेरी येथील कायमस्वरूपी आगमनापूर्वीच्या जीवनप्रवासावर येथे प्रकाश टाकला आहे.

शक्ति-सोपान
विविधतेतून एकता

मार्च २०२० – लढाया आणि युद्ध हे आजचे वास्तव आहे, परंतु मानवजातीची एकता ही भावी अटळता आहे. आपल्याला बाह्यतः पाहताना जरी विभिन्नता आणि अलगता दिसत
असली तरी, हे विश्‍व म्हणजे एक आंतरिक गहन, गुप्त अशी एकता आहे. ह्या विभिन्नतेमागे, विविधतेमध्येसुद्धा एक महान प्रयोजन आहे. विविधतेतून एकता निर्माण करणे हे ते प्रयोजन होय. ‘विविधतेतून एकता’ ह्या संकल्पनेला हा अंक समर्पित आहे.

एप्रिल २०२० – दि. २४ एप्रिल १९२० रोजी श्रीमाताजी पाँडिचेरी येथे कायमच्या वास्तव्यास आल्या. अभीप्सा मासिकाचा एप्रिल महिन्याचा हा अंक याच विषयास वाहिलेला आहे. ‘पार्थिवाचे रूपांतरण’ हे जे श्रीमाताजींचे कार्य आहे, त्या कार्याच्या दृष्टीनेही, या दिवसाला विशेषच मोल आहे. श्रीमाताजींनी या दिवसाचे महत्त्व पुढीलप्रमाणे नमूद केले आहे, “माझा पाँडिचेरीला परतण्याचा दिवस म्हणजे विरोधी शक्तींवर खात्रीपूर्वक मिळविलेल्या विजयाची दृश्‍य खूण आहे.”

पुनरागमन
आरोग्याची गुरुकिल्ली

मे २०२० – आजारपणाच्या विळख्यात सापडलो की आपण काय करतो? त्यांचे मूळ कारण काय असते ? आजारी पडल्यानंतर आपणही काही करू शकतो का, काही केले
पाहिजे का? की केवळ डॉक्टर आणि त्यांनी सांगितलेल्या औषधांवरच विसंबून असले पाहिजे? हे व यासारखे अनेक प्रश्‍न माणसाच्या मनात घोंघावत राहतात. आरोग्य, उपचार, त्यासंबंधीचे काही व्यावहारिक उपाय, रोगोपचार व त्यासंबंधातील आपली भूमिका, आणि एकूणच यासंबंधीचा गहनगंभीर असा दृष्टिकोन या अंकामध्ये मांडण्यात आला आहे.

जून २०२० – मनुष्याप्रमाणेच प्राणिमात्र, वृक्षवल्ली यांना सुद्धा जिवंत राहण्याचा तितकाच अधिकार आहे आणि ईश्‍वराचे आपल्यावर जेवढे प्रेम आहे तेवढेच त्यांच्यावरही आहे, हे ओळखून त्यांना योग्य ती वागणूक देण्याची कदाचित हीच वेळ आहे. हा अंक म्हणजे प्राणिजीवनाविषयी सत्यतर ज्ञान मिळविण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच या मध्ये श्रीमाताजींचे प्राणिमात्रांवर जे प्रेम होते, त्यासंबंधीच्या काही आठवणी देखील नमूद करण्यात आल्या आहेत.

मैत्र जीवांचे
मानसिक परिपूर्णता

जुलै २०२० – योगसाधना म्हणजे काही केवळ तंत्र आणि योगपद्धती नव्हेत; तर योगप्रक्रियेला साहाय्य करणाऱ्या दृष्टिकोनांचादेखील त्यामध्ये समावेश होतो. काही दृष्टिकोन हे श्रीमाताजींच्या शक्तीकार्यास साहाय्यभूत होणारे असतात, तर काही त्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करणारे असतात. पूर्णयोगासाठी अनिवार्य असणाऱ्या, आपल्या मानसिक परिपूर्णत्वाचा एक भाग असणाऱ्या, काही विशिष्ट अभिवृत्तींचा विचार आपण या अंकात करणार आहोत.

ऑगस्ट २०२० – श्रीअरविंद इ. स. १९१० साली पाँडिचेरीला येण्यापूर्वी ते भारतीय राजकारणामध्ये सक्रियपणे कार्यरत होते. आंतरिक दिव्य आदेशानुसार राजकारणातून निवृत्त होऊन श्रीअरविंद पाँडिचेरी येथे आले. पाँडिचेरी ही त्यांची तपस्याभूमी असेल की, जिथे ते मानवासाठी आणि पृथ्वीसाठी अतिमानवतेच्या साधनेमध्ये निमग्न राहतील आणि त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांमध्ये श्रीमाताजी सहभागी होतील, हे विधिलिखित होते. श्रीअरविंद पाँडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्य करू लागले, तेव्हाच्या सुरुवातीच्या काही वर्षांवर हा अंक आधारित आहे.

तपस्येची गुंफा
पारंपरिक योग

सप्टेंबर २०२० – ‘श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग’ हा सर्व पारंपरिक योगांचा समन्वय आहे आणि त्याहूनही अधिक असे काही त्यामध्ये आहे. हा समन्वय करताना, पारंपरिक योगमार्गांचे स्वतः आधी अनुसरण करून, तसे प्रयोग करून, श्रीअरविंदांनी त्याआधारे प्रत्येक पारंपरिक योगामधील बलस्थानं आणि त्यांच्या मर्यादा स्वतः ज्ञात करून घेतल्या. त्यांच्या ‘योगसमन्वय’ या ग्रंथामध्ये पारंपरिक योग, त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांचा खूप सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लिखाणातील अंशभागाचा समावेश येथे करण्यात आला आहे. अभीप्सा मासिकाच्या या अंकामध्ये ‘पारंपरिक योग’ ह्या विषयावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

ऑक्टोबर २०२० – योगाची इमारत ही ‘समत्व’ या गुणाच्या भक्कम पायावर उभारली जाते. समत्व या मूलभूत गुणासाठी श्रीअरविंदांनी स्वतःच्या लिखाणामध्ये अनेक प्रकरणे आणि सर्वाधिक पाने खर्ची घातली आहेत, यावरून या गुणाचे पूर्णयोगातील अतीव महत्त्व ध्यानात येते. ‘अभीप्सा’ मासिकाच्या ऑक्टोबरच्या या अंकात, योगाच्या ‘समत्व’ या पैलूवर प्रकाश टाकलेला आहे.

समत्व
पूर्णयोगाचे योगसूत्र

नोव्हेंबर २०२० – मन, प्राण आणि शरीरधारी मनुष्याला पूर्णत्वप्राप्ती करून घ्यावयाची असेल तर कोणताही एक योग आंशिक रीतीने पुरेसा पडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महायोगी श्रीअरविंद यांनी पारंपरिक योगाचे सार सूत्ररूपाने ग्रहण करून, त्याच्या आधारावर पूर्णयोगाची मांडणी केली. त्यांच्या समग्र साहित्यामधून पूर्णयोगाचे अनेक पैलू उलगडवून दाखविण्यात आलेले आहेत. श्रीअरविंदांनी पूर्णयोगाची तात्त्विक बैठक सिद्ध केली आणि श्रीमाताजींनी प्रत्यक्ष व्यवहारात या योगाचे आचरण कसे करावयाचे त्याचा आदर्श नेमून दिला. त्यामुळे दैनंदिन जीवनात, व्यवहारात पूर्णयोग कसा आचरणात आणावा यासंबंधी तपशीलवार वर्णन श्रीमाताजींच्या वाङ्मयात आढळते. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या दोघांच्या विचारसंपदेमधून ’पूर्णयोगाची योगसूत्रे’ अभीप्सा मासिकाच्या नोव्हेंबरच्या या अंकात संकलित केली आहेत.

डिसेंबर २०२० – सामान्य माणूस मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच भयभीत झालेला असतो. शास्त्रज्ञ मंडळी मृत्युवर मात करण्यासाठी संशोधन करत असतात. संत मंडळी आपल्याला ‘मरणाचे स्मरण असावे’ असे सांगतात. गूढवाद्यांना मृत्यू व त्यानंतरचे जीवन खुणावत राहते. तर अध्यात्ममार्गावर ज्यांची वाटचाल सुरू झालेली असते अशा मंडळींची जन्म-मृत्युच्या कोड्याची उकल व्हावी म्हणून धडपड चालू असते. काहीही असले तरी, सर्वांनाच आपले जीवन अखंडित राहावे, मृत्युमुळे ते संपुष्टात येऊ नये, अशी आस असते. अमृत, अमरता, अमर्त्यत्व या गोष्टींची ओढ साऱ्यांनाच असते. जीवनाच्या अविनाशत्वाविषयी ही संवेदना निसर्गाने उपजतच माणसांत पेरलेली असते. पण त्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला नेमकेपणाने उलगडलेला नसतो. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी अमर्त्यता म्हणजे काय ते सांगून, अमर्त्यत्व कसे प्राप्त करून घेता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. अभीप्सा मासिकाच्या डिसेंबरच्या ‘अमर्त्यत्वाचा शोध’ या अंकामध्ये त्यावर प्रकाश टाकला आहे.

अमर्त्यत्वाचा शोध