अभीप्सा मासिकाची भूमिका

‘अभीप्सा’ (Aspiration towards The Divine) हे पाँडिचेरी येथील योगी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांना वाहिलेले मासिक. हे मासिक इ.स. १९७५ सालपासून अव्याहतपणे प्रकाशित होत आहे.

पाँडिचेरी येथून श्रीअरविंद सोसायटीतर्फे प्रकाशित होणाऱ्या All India Magazine ची ही मराठी आवृत्ती आहे. ह्या मराठी आवृत्तीचे काम अमरावती, पुणे आणि पाँडिचेरी येथून चालते.

अखिल मानवजातीला कवेत घेत, संतविचारांचा मागोवा घेत, वेदोपनिषदांचे परिशीलन करत आणि योगसाधनेमधील अनुभूतींच्या आधारे मांडणी करण्यात आलेले श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे लिखाण व वाङ्मय हे बुद्धिनिष्ठ व्यक्तीचे समाधान करणारे आहे.

अध्यात्मक्षेत्रातील अतिमानस योगाचे प्रणेते, पूर्णयोगाचे उद्गाते म्हणजे श्रीअरविंद. त्यांचे बहुतांशी सारे साहित्य मूळात इंग्रजी व बंगाली भाषेत आहे. तर श्रीमाताजी यांचे बहुतांशी वाङ्मय फ्रेंच व इंग्रजी भाषेत आहे.  हे दुर्मिळ विचारधन मराठीत आणण्याचे प्रयत्न ’अभीप्सा’च्या माध्यमातून अव्याहतपणे चालू आहेत.

श्रीअरविंदांचे प्रमुख साहित्य मराठीमध्ये अनुवादित करण्याचे थोर कार्य सेनापती पां. म. बापट यांनी केले. ते ग्रंथरूपाने मोठ्या प्रमाणात प्रकाशितही झालेले आहे.

परंतु कालानुरूप भाषा बदलत आहे; जाडेजुडे ग्रंथ वाचत बसण्याएवढी फुरसत आता मिळत नाही; दहा दिशांनी धावणाऱ्या मनाला एका जागी बांधत तत्त्वज्ञानाएवढी गंभीर गोष्ट समजावून घेण्याइतपत मनाला स्वस्थता नाही. यावर उपाय काय ? तर मासिक हा त्यावर एक निश्चित पर्याय असू शकतो ही आमची धारणा आहे.

या मासिकामध्ये श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या समग्र साहित्याचा धांडोळा घेऊन, एकेका विषयाला वाहिलेले लिखाण दरमहा प्रकाशित केले जाते आणि त्यामुळे अमुक एका विषयावर त्यांची मते काय आहेत हे समजावून घ्यावयास हातभार लागतो. मासिकाच्या अभ्यासातून एकदा बैठक पक्की झाली की, मग ग्रंथरूप साहित्य वाचणेही अवघड जात नाही, असा अनुभव आहे. म्हणून श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांचे समग्र साहित्य हे यथातथ्य स्वरुपात वाचकांपर्यंत पोहोचविण्याची ही धडपड आहे.

धन्यवाद
…संपादक, अभीप्सा